यावर आज पत्रकार परिषदेत विचारले असता पवार यांनी उपरोधिक प्रतिक्रिया दिली. पवार म्हणाले, काँग्रेस आणि आमची विचारधारा गांधी, नेहरुंची विचारधारा आहे. त्यामुळे काँग्रेसशी मिळतेजुळते विचार मांडतो. सत्तेत एकत्र असताना सहकारी पक्षांबद्दल काय आणि कसे बोलावे, याचे भान प्रत्येक पक्षातील सहकाऱ्यांनी ठेवायला पाहिजे. पटोले हे भाजपकडून खासदार झाले होते. त्यामुळे त्या विचारधारेचा प्रभाव त्यांच्यावर अजून असावा.
अनिल देशमुख यांच्यावरील कारवाईबद्दल बोलताना पवार म्हणाले की राजकीय नेत्यांवर बेछूट आरोप करायचे आणि त्याला सामोरं जायचं नाही, याला काही अर्थ नाही. त्यांच्यावर आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीरसिंग आता सांगतात की, माझ्याकडे यापेक्षा जास्त काही पुरावे नाहीत आणि कळस म्हणजे ते परमबीर सिंग सध्या फरार आहेत. केवळ परमबीर यांच्या मूर्खपणामुळे देशमुखांना कोठडीत जावं लागलं. काहीही संबंध नसताना त्यांना कोठडीत जावं लागतं, हा त्यांच्यावर अन्याय आहे. त्यांना याच्या अनेक वेदना होत असतील, असे पवार म्हणाले.