*देशात सर्वोत्तम ठरली राज्याच्या ऊर्जा विभागाची कामगिरी*
ऊर्जा विभागाच्या शिरपेचात ‘स्कॉच’ पुरस्काराचा तुरा,
मुख्यमंत्र्यांनी केले ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे अभिनंदन
*ऊर्जा मंत्री डॉ. राऊत यांनी केले कर्मचा-यांचे अभिनंदन*
मुंबई : देशातील सर्वोत्तम कामगिरीसाठी स्कॉच संस्थेतर्फे दिला जाणारा प्रथम पुरस्कार मिळाल्याने राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या पुरस्काराबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे तर ऊर्जा मंत्री डॉ. राऊत यांनी उर्जा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे.
ऊर्जा विभागाअंतर्गत येणाऱ्या महापारेषण कंपनीने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स स्कॉच अवार्ड इन पॉवर ॲण्ड एनर्जी’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ही महाराष्ट्राच्या द्दष्टीने अतिशय अभिमानास्पद कामगिरी असून या पुरस्काराबाबत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी महापारेषण कंपनीतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
नवी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री दिनेश वाघमारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाने ‘इंडिया गव्हर्नन्स फोरम’ च्या ‘स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट २०२१ मध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला.
ऊर्जा मंत्र्यांनी केले अभिनंदन
मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी स्कॉच पुरस्काराबद्दल अभिनंदन केल्याबद्दल ऊर्जा मंत्री डॉ. नितीनव राऊत यांनी त्यांचे आभार मानले आहेत. राज्यातील जनतेला शेतक-यांना व उद्योगांना गुणवत्तापूर्ण वीज पुरवठा करण्यासाठी मा. मुख्यमंत्र्यांचे सहकार्य व साथ मोलाचे ठरली, अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली आहे.
“मागील दोन वर्षात तौक्ते व निसर्ग या चक्रीवादळाच्या प्रकोपासोबतच कोरोनाचा काळ असंतानाही ऊर्जा विभागातील महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या कंपन्यांनी ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा व उच्चदर्जाची सेवा दिली. कोळसा टंचाई असतानाही राज्याला भारनियमनाच्या संकटापासून वाचविले. हा पुरस्कार म्हणजे विपरित काळात दिलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेचा आणि ऊर्जा विभागातील कर्तव्यनिष्ठ प्रत्येक अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञ यांचा सन्मान आहे,’’ अशा शब्दात ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ऊर्जा विभागातील सर्वांचे अभिनंदन केले आहे.
“ ऊर्जा विभागाला प्रगती पथावर नेण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करून नियोजन केले. यासाठी धोरणे आखली. त्याला तीनही वीज कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी आपल्या कणखर, कुशल व प्रभावी प्रशासकीय व व्यवस्थापकीय कौशल्याने ही कामगिरी साध्य करण्यात मोलाचे योगदान दिले. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. याशिवाय संचालक मंडळ, सर्व अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञ यांनी एकसंघ पद्धतीने केलेले काम व त्यांना त्यांच्या कुटुंबियांची लाभलेली साथही मोलाची ठरली. ऊर्जा विभागाला देशात अव्वल बनविण्याच्या माझ्या व शासनाच्या प्रयत्नांना साथ दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व अभिनंदनही करतो,” अशी प्रतिक्रिया डॉ. राऊत यांनी या पुरस्काराबाबत व्यक्त केली.
का ठरला राज्याचा ऊर्जा विभाग अव्वल?
महापारेषणने ड्रोनचा वापर करून दुर्गम भागातील अति उच्चदाब वाहिन्यांचे सर्वेक्षण आणि देखरेख करण्यात येत आहे. मुंबई उपनगर व शहरी भागातील महत्वाच्या पारेषण वाहिन्यांच्या जुन्या तारा बदलून नवीन एचटीएलएस कंडक्टरचा उपयोग करून वाहिन्यांच्या क्षमतेत वाढ केली. मोनोपोल मनोऱ्यांचा वापर सुरू केला परिणामी, वहिवाट मार्गाची समस्या कमी करण्यात व रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध झाला.
‘एचव्हीडीसी योजने’अंतर्गत एकूण १ लाख २९ हजार ५४६ कृषीपंप ऊर्जान्वित झाले. ‘मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत एकूण ९९ हजार ७४४ कृषीपंप बसविण्यात आले. एप्रिल २०२१ पासून सुरू झालेल्या ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमाती व भटक्या विमुक्त घटकांसाठी सुमारे १२ हजार १०२ घरगुती वीजजोडणी देण्यात आली. तसेच एप्रिल महिन्यात राज्यात वीज संकट निर्माण झाले असतांना महानिर्मिती कंपनीने विक्रमी वीजनिर्मिती करून राज्यातील जनतेला भारनियमनमुक्त ठेवण्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
दिनचर्या न्युज