शासकीय कोविड लसीकरण केंद्रावर आता प्रतिबंधात्मक डोज मोफत





शासकीय कोविड लसीकरण केंद्रावर आता प्रतिबंधात्मक डोज मोफत

15 जुलै ते 30 सप्टेंबर या कालावधीत ‘कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव’

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 15 जुलै : केंद्र व राज्य सरकारच्या सुचनेनुसार 15 जुलै ते 30 सप्टेंबर 2022 (75 दिवस) या कालावधीमध्ये ‘कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव’ अंतर्गत सर्व शासकीय कोविड लसीकरण केंद्रावर प्रतिबंधात्मक (बुस्टर) डोज आता मोफत मिळणार आहे. 18 वर्षावरील नागरिकांनी त्यांच्या कोविड लसीच्या दुस-या डोजनंतर 6 महिने किंवा 26 आठवड्यांचा कालावधी पूर्ण केलेला असावा. जास्तीत जास्त पात्र नागरिकांनी प्रतिबंधात्मक डोज घेऊन स्वत:ला सुरक्षित करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अजय गुल्हाने यांनी केले आहे.

कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सवाअंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, मॉल्स, आठवडी बाजार आदी ठिकाणी विशेष लसीकरण शिबिरांचे आयोजन करावे. गणेशोत्सवादरम्यान सर्व गावांमध्ये गणेश मंडळांच्या सहाय्याने लसीकरण शिबिर घेण्यात यावे. जिल्हा व तालुकानिहाय तसेच लसीकरण केंद्रनिहाय लसीकरण सत्रांचे आयोजन करावे. स्थानिक स्थरावरून दर आठवड्याला लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात यावा. जिल्हा व तालुका स्तरावरून लसीकरण केंद्रनिहाय दुसरा डोज व प्रतिबंधात्मक डोज राहिलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या देण्यात याव्या.

जिल्हा, तालुका व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील कॉल सेंटर मार्फत दुसरा डोज व प्रतिबंधात्मक डोज राहिलेल्या लाभार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना लस घेण्याबाबत पाठपुरावा करावा. उपलब्ध असलेल्या लसींचा वापर करून लस मुदतबाह्य होणार नाही, याबाबत खबरदारी घ्यावी. जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीत हरदस्तक मोहीम राबविण्यात येत असून आरोग्य चमू मार्फत घरोघरी जाऊन पात्र लाभार्थ्यांना कोविड लसीकरणाचा प्रतिबंधात्मक डोज देण्यात यावा, अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी महानगर पालिकेचे वैद्यकीय अधिकारी, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी व प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिका-यांना दिल्या आहेत.

दिनचर्या न्युज