ज्येष्ठ पत्रकार सुनिल देशपांडे यांना जीवनगौरव तर हुनगूंद व प्रा. मुल्लेमवार यांना कर्मवीर पुरस्कार





ज्येष्ठ पत्रकार सुनिल देशपांडे यांना जीवनगौरव तर हुनगूंद व प्रा. मुल्लेमवार यांना कर्मवीर पुरस्कार

*चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाचा उपक्रम*

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघातर्फे दिला जाणारा जीवनगौरव व कर्मवीर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून ,यावर्षी जीवनगौरव हा मानाचा पुरस्कार जेष्ठ पत्रकार सुनिल देशपांडे यांना जाहीर करण्यात आला आहे. तर पत्रकारितेत योगदान व प्रदीर्घ सेवा देणा-या पत्रकारांना देण्यात येणारा प्रतिष्ठेचा कर्मवीर पुरस्कार जेष्ठ पत्रकार बाळ हुनगुंद आणि प्रा. यशवंत मुल्लेमवार यांना जाहीर करण्यात आला आहे. शाल,श्रीफळ,स्मृतिचिन्ह आणि सन्मान राशी,असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी सुनिल देशपांडे यांनी 38 वर्षे पत्रकारितेमध्ये योगदान दिले आहे. नागपूर येथे जन्मलेले सुनिलभाऊ देशपांडे यांनी बी.ए.चे शिक्षण वर्धा येथे पुर्णकेल्यानंतर एम.ए. नागपूर येथे पुर्ण केले.नागपूर विद्यापीठ येथे बी.जे. करून जेष्ठ पत्रकार सुरेश व्दादशीवार यांच्यापासून प्रेरणा घेत पत्रकारितेत प्रवेश केला. त्यांनी युगधर्म,नागपूर टाईम्स,पत्रिकामध्ये जिल्हा प्रतिनिधी काम पाहिले. जानेवारी 1985 ते 2018 पर्यंत द हिदवाद या इंग्रजी दैनिकात चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जवाबदारी सांभाळली.अखेरपर्यंत चंद्रपूर जिल्हा कार्यालयात सेवा दिली. 21 जुन 2018 रोजी ते सेवानिवृत्त झाले,पण त्यानंतरही दोन वर्षे त्यांनी अधिक सेवा दिली.1985 ते 2020 पर्यंत चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या विविध पदावर राहून त्यांनी संघाच्या उत्कर्षासाठी मोलाची कामगिरी केली.
सुनिल देशपांडे यांना सकारात्मक पत्रकारितेचा उत्कृष्ट पुरस्कार मिळाला आहे. आपुलकी,जिवंत मरण,प्रकाश चांदली या नाटकांचे लेखन केले आहे. त्यांची 8 नाटके राज्य पुरस्काराने सन्मानित झाली.सद्या ते राज्य श्रमिक पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आहेत.


कर्मवीर पुरस्काराचे यंदाचे मानकरी ठरलेले जेष्ठ पत्रकार बाळ हुनगुंद यांनी 30 वर्षे पत्रकारितेत योगदान दिले आहे.सन 1992 ते 2000 पर्यंत द इंडियन एक्सप्रेस नागपूरचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम बघितल्यानंतर 2000 ते 2010 पर्यंत त्यांनी द हितवाद नागपूर येथे रिपोर्टर म्हणून जबाबदारी सांभाळली. सन 2010 ते 2019 पर्यंत द प्रेस ट्र्स्ट ऑफ इंडियाचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम केले. इंग्रजी माध्यमात पत्रकारितेमध्ये भरीव योगदानाबद्दल सन 2007 मध्ये अनंत गोपाल शेवडे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कर्मवीर पुरस्काराचे दुसरे मानकरी प्रा.यशवंत मुल्लेमवार यांनी शिक्षकी पेक्षा सांभाळून 1986मध्ये दै.महासागर येथून पत्रकारितेत पाऊल टाकले.त्यानंतर 1986 मध्ये दै.महाविदर्भ येथे आणि 1993 ला दै.जनवाद मध्ये चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी म्हणून जबाबदारी सांभाळली. 2001 मध्ये दै.नवराष्ट्र मध्ये कार्य केले. यानंतर पुन्हा दै.महाविदर्भ मध्ये विविध पुरवणीचे संयोजक पद सांभाळले. पत्रकारितेतील योगदानाबदल त्यांना 1990 मध्ये अ.भा. दलित साहित्य अकादमीने दिल्ली येथे आंबेडकर फेलोशिप जाहीर केली. दरम्यान चंद्रपूर जिल्हा विकास समताताई नालमवार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
या तिनही ज्येष्ठ पत्रकारांना पत्रकार दिनानिमित्य (01 ऑगस्ट 2022) आयोजित चंद्रपूर श्रमिक पत्रकार संघाच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात सन्मानित केले जाणार आहे.

दिनचर्या न्युज :-