जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांसह वादग्रस्त अधिकाऱ्यांची ‘ईडी’कडे तक्रार दारू दुकान वाटप व स्थलांतरण घोटाळा प्रकरण : पप्पू देशमुख आक्रमक
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांसह वादग्रस्त अधिकाऱ्यांची ‘ईडी’कडे तक्रार

दारू दुकान वाटप व स्थलांतरण घोटाळा प्रकरण : पप्पू देशमुख आक्रमक

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : नियम धाब्यावर बसवून निवासी वस्तीमध्ये तसेच अनधिकृत बांधकाम असलेल्या इमारतीमध्ये दारू दुकानांचे स्थलांतरण व नवीन दारू दुकानांचे वाटप केल्याचा व यामध्ये १८ ते २० करोड रुपयांची आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा आरोप जनविकास सेनेचे अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी केला होता. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयावर शेकडो नागरिकांसह मोर्चा काढून रिक्षाने पुरावे दिले होते. सोमवारी तर थेट देशमुख यांनी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची सक्त वसुली संचालनालयाकडे (इडी)कडे तक्रार केली आहे.

यामध्ये जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक संजय पाटील, निरीक्षक मारुती पाटील, दुय्यम निरीक्षक अमित शिरसागर, तत्कालिन अधीक्षक सागर ढोमकर, मनपा आयुक्त राजेश मोहिते, तालुका भूमिलेखचे उपाधीक्षक मिलिंद राऊत यांच्यासह जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांचा समावेश आहे. सोमवारी जनविकासचे पप्पू देशमुख, राहुल दडमल, गितेश शेंडे इत्यादींच्या शिष्टमंडळाने सक्त वसुली संचालनालयाचे नागपूर येथील उपसंचालक कार्यालय गाठून लेखी तक्रार केली.

कोट
निवासी जागेमध्ये नागरिकांचा विरोध डावलून तसेच नियम धाब्यावर बसवून मनमानी पद्धतीने चंद्रपूर शहर व संपूर्ण जिल्ह्यामध्ये दारू दुकानांचे स्थलांतरण व नवीन दुकानांचे वाटप करण्यात आले आहे. पुरावे देऊन दारू दुकानांचा विरोध करणाऱ्या नागरिकांविरुद्ध पोलीस बळाचा वापर करून दडपशाही करत आहे. त्यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकरणात दोषी असलेल्या प्रत्येक अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाल्याखेरीज स्वस्थ बसणार नाही.
-पप्पू देशमुख, अध्यक्ष जनविकास सेना, चंद्रपूर

बॉक्स
अधिकाऱ्यांबाबत स्फोटक माहिती

जिल्हाधिकारी कार्यालयात 'विजी' नावाच्या एका कर्मचाऱ्यांशी बोलणे झाल्याखेरीज कोणत्याही 'अर्थ'पूर्ण फाईलवर स्वाक्षरी होत नाही. शहरातील एका ठाण्यात 'जिडी' नावाचा कर्मचारी मोठी आर्थिक जबाबदारी सांभाळतो. यांनी तुकूम परिसरात नुकताच एक कोटींच्या जवळपास किंमतीचे घर बांधले. जिल्ह्यातील काही पोलीस अधिकाऱ्यांनी अवैध व्यवसायामधून करोडो रुपयांचे फार्म हाऊस, काहींनी शेतीमध्ये गुंतवणूक केली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने तर यवतमाळ जिल्ह्यातील एका सट्टा किंगच्या नावाने अनेक महागड्या गाड्या घेतल्याची व गुंतवणूक केल्याची चर्चा आहे. काही पोलीस अधिकाऱ्यांची तर थेट अवैध व्यवसायिकांसोबत भागीदारी करण्यापर्यंतच मजल गेल्याचीसुद्धा चर्चा आहे. मात्र सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याची मोहीम जनविकास सेनेने हाती घेतली आहे.