नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करा- युवा नेते दिवाकर निकुरे
आकापुरात शेतकरी महिलेचा घेतला होता बळी
दिनचर्या न्युज :-
चिमूर- प्रतिनिधी
ब्रह्मपुरी वन विभागाच्या तळोधी (बा.) वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या गंगासागर हेटी बिट. कक्ष क्र.2 मध्ये आकापूर येथील एका शेतकरी महिलेचा स्वतःच्या शेतात काम करीत असताना ठार करणाऱ्या नरभक्षक वाघाचा तातडीने बंदोबस्त करण्यात यावा. अशी मागणी चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवा काँग्रेस नेते दिवाकर निकुरे यांनी केली आहे.
तळोधी (बा.)वन परीक्षेत्राअंतर्गत वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्यांच्या एकापाठोपाठ तीन घटना घडलेल्या आहेत. मंगळवारी चिमूर तालुक्यातील सावरगाव येथील ईश्वर कुंभारे, बुधवारी नागभीड तालुक्यातील आकापूरयेथील दुर्गा चनफने तर शनिवारी पुन्हा चिमूर तालुक्यातील डोमा येथील डोमळू सोनवाने या गुराख्याला वाघाने ठार केले आहे.सलग एकापाठोपाठ वाघाच्या हल्ल्यात मनुष्याचा बळी जात असताना वन विभाग या बाबिकडे गांभीर्याने बघत नसल्यामुळे जनतेत असंतोष पसरला आहे. सद्यस्थितीत ग्रामीण भागात खरीप हंगामाचे काम वेगाने सुरू आहेत.रोवणीचा हंगाम तर भरात आला आहे.अशावेळी शेतकऱ्यांनी वाघाच्या भीतीने घरी बसून राहायचे.की शेती करायची? हा गंभीर प्रश्न आवासून उभा आहे. याबाबतीत वन विभागाने विशेष दखल घ्यायला हवी. वारंवार शेतकऱ्यांशी चर्चा करून उपाययोजना,मार्गदर्शन व्हायला हवे.मात्र तसे न घडता मनुष्याची जीव हानी घडत आहे. बुधवारी आकापूर येथील दुर्गा चनफने या होतकरू शेतकरी महिलेला वाघाने ठार केले.तेव्हा तिच्या कुटुंबावर काय दुःख कोसळले असेल.ह्याची कल्पना करणे अवघड आहे.शिवाय आकापूर मार्गाने तळोधीला शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. तळोधी बाजार पेठेत येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.तेव्हा पुन्हा अनुचित घटना घडू नये. म्हणून वन विभागाने तातडीने या नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करावा.अशी मागणी चिमूर विधानसभा क्षेत्राचे युवा काँग्रेस नेते दिवाकर निकुरे यांनी केली आहे.