24 कोटींची वादग्रस्त निविदा अखेर रद्द, मात्र आयुक्तांना अभय ? तर न्यायालयात दाद मागणार...पप्पू देशमुख




24 कोटींची वादग्रस्त निविदा अखेर रद्द, मात्र आयुक्तांना अभय ?

तर न्यायालयात दाद मागणार...पप्पू देशमुख


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
16 मार्चला लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर चंद्रपूर महानगरपालिकेने दिनांक 18 मार्च रोजी शहरातील रामाळा तलावाच्या पुनर्जीवनाची 24 कोटी रुपये किमत असलेल्या नविन कामाची निविदा प्रसिद्ध केली. या प्रकरणात चंद्रपूर मनपाचे माजी नगरसेवक जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख यांनी जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा तसेच राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे आदर्श आचारसंहितेचा भंग झाल्याची लेखी तक्रार केली. या तक्रारीनंतर 26 मार्च रोजी मनपाने वादग्रस्त निविदा प्रक्रिया रद्द केली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर नवीन कामासाठी ई-निविदा प्रक्रिया सुरू केल्यास आदर्श आचारसंहितेचा भंग होत असल्याची पूर्ण माहिती आयुक्त विपिन पालीवाल यांना आहे. या कामासाठी 540 दिवसांचा कालावधी असतानांही केवळ 8 दिवसांच्या कालावधीत निविदा प्रक्रिया पूर्ण करून मर्जीतील कंत्राटदाराची नेमणूक करण्याचा प्रयत्न मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांनी केल्याचा आरोप देशमुख यांनी केला.

निवडणूक निरीक्षक लोकेश कुमार जाटव यांच्याकडे तक्रार

गरज पडल्यास न्यायालयात जाणार

आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याची तक्रार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे केल्यानंतर मनपा प्रशासनाने 24 कोटी रुपये किमतीची वादग्रस्त निविदा प्रक्रिया दिनांक 26 मार्च रोजी रद्द केली. मात्र हेतुपुरस्पर आदर्श आचारसंहितेचा भंग करणारे मनपा आयुक्त यांचे विरूध्द आजपर्यंत कोणतीही कठोर कारवाई निवडणूक विभागाने केली नाही. आयुक्त पालीवाल सात वर्षांपासून जिल्ह्यात कार्यरत असून त्यांची कारकीर्द वादग्रस्त असल्याची माहिती निवडणूक विभागाला देण्यात आली. गंभीर तक्रारीनंतरही आयुक्त पालीवाल यांचे विरुद्ध निवडणूक विभागाने तातडीने कारवाई का केली नाही ? निवडणूक विभाग मनपा आयुक्त विपिन पालीवाल यांना कारवाई पासून सूट देत आहे का ?असा प्रश्न आहे. याबाबत वन अकादमी येथे आलेले चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा क्षेत्राचे सामान्य निरीक्षक लोकेश कुमार जाटव यांच्या कार्यालयात 29 मार्चला लेखी तक्रार नोंदवली. निवडणूक विभागाने आयुक्त पालीवाल यांचे विरुद्ध कठोर कारवाई न केल्यास न्यायालयात दाद मागणार अशी प्रतिक्रिया पप्पु देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.