चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी काँग्रेसने बळीराज धोटे यांना द्यावी - ६० संघटनाची मागणी





चंद्रपूर लोकसभेची उमेदवारी काँग्रेसने बळीराज धोटे यांना द्यावी - ६० संघटनाची मागणी

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
विविध सामाजिक संघटनांची पत्रकार परिषदेत मागणी
चंद्रपूर : चंद्रपूर लोकसभेसाठी उमेदवारी देण्यावरून काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू आहे. अद्यापही उमेदवारीवर तोडगा निघाला नाही. तर दुसरीकडे ओबीसींच्या हक्कासाठी आणि संविधानाच्या संरक्षणासाठी ओबीसी नेते बळीराज उर्फ परशुराम धोटे यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी गुरुवारी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केली आहे.

बळीराज धोटे फुले-शाहू-आंबेडकर, रामास्वामी पेरियार, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम आदी महापुरुषांच्या विचाराने प्रेरीत होऊन बहुजनांच्या, ओबीसींच्या हक्कासाठी सातत्याने लढा देत आहेत. ओबीसींच्या हक्कासाठी त्यांनी अनेकदा आंदोलने केली आहेत. बळीराज धोटे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली तर चंद्रपूर लोकसभेत सांप्रदायिक व संविधानविरोधी आणि भारतएक्य विरोधी शक्तींना रोखणे शक्य होईल, असा विश्वास विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला आहे. बळीराज धोटे यांनी इंडिया आघाडीचा उमेदवार घोषित करण्यासाठी काँग्रेस श्रेष्ठींकडे निवेदन पाठविण्यात आल्याचेही यावेळी उपस्थितांनी सांगितले. यासाठी चंद्रपुरातून तब्बल ६० विनंतीपत्र काँग्रेस श्रेष्ठींकडे पाठविण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यातआली.
पत्रकार परिषदेला सोशलिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय सचिव किशोर पोतनवार, सत्यशोधक समाजाचे सूर्यभान झाडे, दिलीप पारवे, भास्कर सपाट, अंनिसचे कार्याध्यक्ष पी. एम. जाधव, स्वतंत्र मजदूर युनियनचे अशोक म्हस्के, अनंता आत्राम उपस्थित होते.