नागरिकांनो! मतदार यादीत नाव तपासून घ्या - जिल्हाधिकारी विनय गौडा
नागरिकांच्या अवलोकनार्थ प्रारुप मतदार याद्या प्रसिध्द
दि. 10,11, 17 व 18 ऑगस्ट रोजी विशेष शिबिरांचे आयोजन
दिनचर्या न्युज :-
*चंद्रपूर, दि. 7 :* आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मतदानापासून कोणताही मतदार वंचित राहू नये, त्यांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी जिल्हा प्रशासन कामाला लागले आहे. भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 6 ऑगस्ट 2024 रोजी प्रारुप मतदार यादी नागरिकांच्या अवलोकनासाठी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, मतदान केंद्र तसेच https://chanda.nic.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत. नागरिकांनी आपले नाव मतदार यादीत आहे की नाही, हे तपासून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसोबत आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (निवडणूक) सुभाष चौधरी यांच्यासह काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा गट), पिपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटीक, अ. भा. रिपब्लीकन पक्ष, ऑल इंडीया रिपब्लिकन पाटी, भारतीय कम्युनिस्ट पक्ष या राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
विशेष संक्षिप्त कार्यक्रमांतर्गत 25 जून ते 5 ऑगस्ट या कालावधीत मतदारांची पडताळणी करण्याकरीता मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडून घरोघरी भेट देणे, मतदान केंद्राचे सुसुत्रीकरण / पुनर्रचना करणे, मतदार यादीतील त्रृटी दूर करणे, मतदारांचे अस्पष्ट असलेले छायाचित्र अद्ययावत करणे, मतदार याद्यांचे मुद्रण करणे इत्यादी उपक्रम राबविण्यात आले. याबाबत प्रारुप मतदार यादी नागरिकांच्या अवलोकनासाठी 6 ऑगस्ट रोजी प्रसिध्द करण्यात आली. नागरिकांनी आताच आपले नाव मतदार यादीत तपासून घ्यावे. तसेच भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार 6 ते 20 ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक मतदान केंद्रावर दावे व हरकती स्वीकारण्यात येणार आहे, असे जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी सांगितले.
*विशेष शिबिरांचे आयोजन :*
जिल्ह्यात प्रत्येक मतदान केंद्रावर दि. 10,11,17 आणि 18 ऑगस्ट 2024 रोजी विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेत मतदारांना संबंधित मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे दावे व हरकती दाखल करता येवू शकेल.
*राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना आवाहन :*
आगामी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत नागरिकांना आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा याकरीता नागरिकांमध्ये जागरुकता निर्माण करणे, मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांना सहाय्य करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्राकरीता प्रतिनिधींची नेमणूक करावी. तसेच सर्व राजकीय पक्षांनी त्यांच्या क्षेत्रातील मतदार यादी त्रृटीरहित ठेवण्यासाठी सर्व पात्र मतदारांची नावे मतदार यादीत समाविष्ठ करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले आहे.
*जिल्ह्यातील विधानसभानिहाय मतदारांची एकूण संख्या :* जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघ मिळून एकूण मतदारांची संख्या 18 लक्ष 2 हजार 474 असून यात पुरुष मतदार 921347, स्त्री मतदार 881086 व इतर मतदार 43 आहे. विधानसभानिहाय 70-राजूरा (पुरुष – 164577, स्त्री – 151123, इतर – 1, एकूण मतदार - 315701), 71-चंद्रपूर (पुरुष – 184119, स्त्री – 178012, इतर – 35, एकूण मतदार - 362166), 72-बल्लारपूर (पुरुष – 155203, स्त्री – 148512, इतर – 3, एकूण मतदार - 303718), 73-ब्रम्हपूरी (पुरुष – 137021, स्त्री – 135627, इतर – 0, एकूण मतदार - 272648), 74-चिमूर (पुरुष – 138655, स्त्री – 135668, इतर – 0, एकूण मतदार - 274323) आणि 75-वरोरा विधानसभा मतदार संघ (पुरुष – 141772, स्त्री – 132144, इतर – 4, एकूण मतदार - 273920)
*जिल्ह्यातील एकूण मतदान केंद्रांची संख्या* : राजूरा – 344 मतदान केंद्र, चंद्रपूर – 390, बल्लारपूर – 366, ब्रम्हपुरी – 319, चिमूर – 314 आणि वरोरा विधानसभा मतदारसंघात 343 असे जिल्ह्यात एकूण 2076 मतदान केंद्र आहेत.
दिनचर्या न्युज