राजकुमार तिरभाने यांच्याकडून प्रेरणा घ्यावी:गजानन ढोबाळे

उमेश तिवारी/कारंजा(घाडगे):

बेघर, निराश्रीत, भटक्या जमातींच्या मुलांना शिकविण्यासाठीची धडपड करणारे राजकुमार तिरभाने यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.भारत देश स्वयंपूर्ण होण्याच्या वाटेवर जरी असला तरी देशातील असंख्य समस्या सुटने कठीण आहे यावेळी शासनाची वाट न बघता आपल्याला काही करता येऊ शकते का याचा विचार करणे फार महत्त्वाचे आहे, असा विचार करणारे राजकुमार तिरभाने यांचा तनिष्का ग्रामीण विकास संस्था लिंगा मांडवी चे अध्यक्ष गजानन ढोबाळे व ग्रामगीताचार्य प्रशांत दादा मानमोडे यांचे हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविकात गजानन ढोबाळे यांनी सत्कारमुर्ती तिरभाने सर यांच्याकडून इतर शिक्षक व विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी असे म्हटले. कोणताही मोबदला न घेता समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी आपलं घर, कुटूंब, आणि शाळा सांभाळून कारंजातील बेघर वस्तीत जाऊन मुलांना शिकविण्यासाठी रोजच जातात. ही प्रेरणादायी घटना आहे. यातुन इतरांनी प्रेरणा घेऊन नवा मार्ग पत्कारावा असे वाटते.
यावेळी श्री तिरभाने म्हणाले की आता त्या मुलांना पण शिकण्याची आवड निर्माण झाली आहे. मुलांना बाराखडी शिकवणे चालू आहे. त्यांना वाटतं की मला माझं नाव लिहीता यावं, घरातल्या सदस्यांची नावे लिहीता यावी अशी जिद्द मनात तयार झाली आहे.
ग्रामगीताचार्य प्रशांतदादा मानमोडे यांनी राष्ट्रसंतांनी सांगितलेले शिक्षणाचे महत्व व ग्रामगीता प्रणित शिक्षणप्रणाली याविषयी विद्यार्थ्यांना प्रबोधन केले.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणुन श्री. सोमकुवर, शिक्षक सोहमनाथ विद्या मंदिर उमरी लाभले होते.त्यांनी सुद्धा गौरवउद्गार केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला संगीता शिरखेडकर, मनिषा ढोले, विजय कोडापे व इतर शिक्षक व शाळेतील विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कोमल डोंगरे तर आभार कुणाल भक्ते यांनी केले.