नागपूरच्या 11000 ग्राहकांचा पुरवठा केला महावितरणने खंडित

विजबिलांचा नियमित भरणा करण्याचे महावितरणचे आवाहन
नागपूर/प्रतिनिधी:

 पाठपुरावा करुनही वीजबिलांचा भरणा करण्यास टाळाटाळ करणा-या महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रातील तब्बल 11 हजार 18 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून ग्राहकांनी वीजबिलांचा नियमितपणे भरणा करून वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळावी, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात तीनशे रुपये व त्यावरील अधिक थकबाकी असलेले घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक वर्गवारीतील तब्बल 1 लाख 62 हजार 133 वीज ग्राहकांकडे सुमारे 81 कोटी 14 लाख रुपयांची थकबाकी असून यापेकी बहुतांश ग्राहकांनी दोन महिन्यांपासून त्यांच्या वीजबिलांचा भरणा केलेला नाही, महावितरणने सप्टेबर महिन्यापासून संपुर्ण राज्यभर सुरु केलेल्या केंद्रीकृत बिलींग प्रणालीमुळे बिलींग़ची संपुर्ण प्रक्रीया महावितरणच्या सांघिक कार्यालयामार्फ़त राबविण्यात येत असून थकबाकीदार ग्राहकांवरही सांघिक कार्यालयाकडून विशेष लक्ष देण्यात येत आहे. थकबाकीचा वाढता बोझा लक्षात घेता महावितरणला आपला आर्थिक गाढा खेचणे तारेवरची कसरत ठरत आहे, वीज खरेदी, कर्मचा-यांचे वेतन, विविध विकास कामांसाठी घेतलेल्या कर्जावरील व्याज देण्यात महावितरणची बहुतांश रक्क्म खर्च होत असल्याने देखभाल व दुरुस्ती यासाठी महावितरणकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने शंभर टक्के थकबाकी वसुलीसाठी महावितरण आग्रही आहे. ही वसूली करण्यासाठी नागपूर परिक्षेत्रांतर्गत असलेल्या संपुर्ण विदर्भात थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची व्यापक मोहीम हाती घेण्यात आली असून या मोहीमेत आतापर्यंत 7865 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. शुन्य थकबाकीचे लक्ष्य निर्धारीत करीत ही मोहीम दिवसेंदिवस अधिक आक्रमक करण्याच्या स्पष्ट सुचना प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत यांनी सर्व क्षेत्रिय अधिका-यांना दिल्या आहेत.

महावितरणच्या या विशेष मोहिमेत आत्तापर्यंत एकूण 1 लाख 62 हजार 133 थकबाकीदार वीज ग्राहकांपैकी 46 हजार 162 ग्राहकांकडून 15 कोटी 5 लाख रुपयांची वसुली करण्यात आली आहे तर 7865 थकबाकीदारांचा वीजपुरवठा तात्पुरत्या स्वरूपात आणि 3153 थकबाकीदारांचा वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला असून उर्वरीत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सर्वत्र मोठ्या प्रमाणात सुरु आहे. पाच हजारावरील आणि एक हजारावरील थकबाकी असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यास प्राधान्य देत महावितरणने ही मोहीमेची अंमलबजावणी अधिक आक्रमकपणे राबविणे सुरु केले असून ग्राहकांनी नियमितपणे वीजबिलांचा भरणा करीत सहकार्य करावे आणि वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

वीजबिल भरण्याचे अनेक पर्याय आणि भरघोस सवलत

विदर्भातील बहुतांश ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी महावितरणकडे केली असल्याने वीजबिलांची अद्ययावत माहिती ग्राहकांना एसएमएसच्या माध्यमातून नियमितपणे उपलब्ध करून दिल्या जात आहे. हा एसएमएस वीज भरणा केंद्रावर दाखवून ग्राहकाला त्याच्या बिलाचा भरणा करणे शक्य असून एसएमएसच्या आधारे बील स्विकृतीस नकार देणा-या बील भरणा केंद्राची तक्रार नजीकच्या महावितरण कार्यालयाकडे करण्याची मुभाही ग्राहकाला देण्यात आली असून, त्यांच्या तक्रारीची शहानिशा करून संबंधित बील भरणा केंद्रांवर कारवाई करण्यात येत असल्याने आता वीजबिल घरी येण्याची वाट न बघता बिल भरणा केंद्रावर एसएमएस दाखवून किंवा ऑनलाईन पद्धतीनेही वीजबिल भरणा करण्याची सुविधा ग्राहकांना उपलब्ध आहे, याशिवाय ‘गो ग्रीन’ च्या माध्यमातून कागदी बिलाएवजी ईमेल च्या माध्यमातून वीज बिल स्वीकारण्याच्या पर्याय स्विकारल्यास ग्राहकाला दहा रुपयांची सवलतही देण्यात येत आहे, याशिवाय एसएमएस मिळताच वीजबिलाचा भरणा केल्यास ग्राहकाला प्रॉम्प्ट पेमेंट्च्या माध्यमातूनही सवलत देण्यात येत असल्याने ग्राहकांनी उपलब्ध पर्यायांचा लाभ घेत वीजबिलाचा भरणा करण्याचे आवाहनही महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.