परभणी जिल्हयात केंद्रीय पथकाने शेतकऱ्यांशी साधला संवाद

केंद्रीय पथकाद्वारे परभणी जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी
परभणी/प्रतिनिधी:
 मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या केंद्रीय पथकाने परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील गणेशपुर, परभणी तालुक्यातील पेडगाव व मानवत तालुक्यातील रुढी गावांना भेटी दिल्या. या भेटी दरम्यान त्यांनी शेतीतील नुकसानीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला व शेतकऱ्यांच्या विविध समस्या जाणून घेतल्या.मराठवाड्यातील दुष्काळी जिल्ह्यांचा दौरा पूर्ण होताच पाहणी दौऱ्याचा अहवाल केंद्राकडे सुपूर्द केला जाणार आहे. इंटर मिनिस्टरियल सेंट्रल टीम (आयएमसीटी)  अंतर्गत येणाऱ्या पथकाचे प्रमुख केंद्रीय नीती आयोगाचे सहसल्लागार मानश चौधरी यांच्या नेतृत्वाखालील या पथकामध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्रालयाचे एस.सी.शर्मा, आणि ग्रामीण विकास मंत्रालयाचे अवरसचिव एस.एन.मेहरा यांचा समावेश होता. या पथकासमवेत विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, अप्पर आयुक्त विजयकुमार फड,अप्पर जिल्हाधिकारी अण्णासाहेब शिंदे, कृषी विभागाचे सहसंचालक जगताप तसेच महसुल व इतर विभागाचे अधिकारी यांचीही उपस्थिती होती.

या पथकाने गणेशपूर शिवारातील श्रीमती त्रिवेणी रामचंद्र गीते यांच्या शेताला प्रथम भेट देऊन तेथील पिक नुकसानीची पाहणी केली. गीते दांपत्याशी व शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करुन पिक उत्पादन व उत्पन्न याविषयी माहिती घेतली. त्यानंतर पथकाने पेडगाव येथील गणेशराव हरकळ यांच्या शेतातील पाणीपातळी खुप खालावलेल्या विहिरीची पाहणी केली. तसेच शेजारच्या हरकळ कुटूंबियांच्या शेतीमधील नुकसानीचीही पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. रूडी गावातील शेतात जाऊन शेतकऱ्यांचे प्रश्न समजावून घेतले. यावेळी आमदार मोहन फड यांनीही दुष्काळ परिस्थिती विषयी पथकाला माहिती दिली. 

यावेळी जिल्हाधिकारी पी. शिवशंकर यांनी जिल्ह्यातील एकंदरीत पाणीटंचाई, पिकांची अवस्था यासोबतच धरणातील पाणीसाठ्याबाबत पथकाला माहिती दिली. पथक प्रमुख चौधरी यांनी सर्व परिस्थितीचा अभ्यास करुन केंद्र सरकारला अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. या पथकाने परभणीनंतर बीड जिल्ह्यातील पाहणीसाठी प्रयाण केले