महा मेट्रो : विविध पदांवर रुजू झाले ३३ अधिकारी


महा मेट्रोने केले नव्या अधिकाऱ्यांचे स्वागत, साधला संवाद

नागपूर  : महा मेट्रोतर्फे राबविण्यात आलेल्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ३३ तरुणांची पहिली तुकडी महा मेट्रोच्या विविध पदांवर आज रुजू झाली. आज आयोजित झालेल्या समारोहात या सर्व उत्साही तरुणांचे महा मेट्रो परिवारात स्वागत करण्यात आले. या तरुणांशी महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित आणि अधिकाऱ्यांनी संवाद साधला. मेट्रोच्या कार्य प्रणाली बद्दल प्राथमिक माहिती तरुणांना देण्यात आली. 



रुजू झालेल्या काही तरुणांची ही पहलीच नोकरी असल्याने याचा वेगळाच आनंद मेट्रोच्या या नवीन अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे झळकत होता. महा मेट्रो परिवारात रुजू झालेले ९५ टक्के अधिकारी नागपूर आणि विदर्भातील इतर जिल्ह्यातील रहिवाशी आहेत


विभागीय अभियंता (Section Engineer), कनिष्ठ अभियंता (Junior Engineer), व स्टेशन कंट्रोलर (Station Controller) / ट्रेन ऑपरेटर (Train Operator) / ट्राफिक कंट्रोलर (Traffic Controller) आणि तंत्रज्ञ (Technician) या पदांकरता घेण्यात आलेली परीक्षा ऑनलाईन टेस्ट, प्रत्यक्ष मुलाखत आणि मेडिकल टेस्ट अश्या तीन टप्यातून पार पडली. पहिल्या टप्यात म्हणजेच ऑनलाईन टेस्ट मध्ये परीक्षार्थींना मराठी विषय अनिवार्य होता. उत्तीर्ण झालेल्या तरुणांना मेट्रो प्रकल्पाविषयी आणि संचालनाविषयी प्राथामिक माहिती देण्यासाठी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशन येथे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मेट्रो प्रकल्पात उपयोग होणारे दूरसंचार (Telecom), सिग्नलिंग (Signalling) आणि ऑटोमॅटिक फेयर कलेक्शन (Automated Fare Collection) याचे देखील प्रशिक्षण विद्यार्थाना देण्यात येणार आहे. प्रशिक्षण कालावधी १ महिन्याचा असेल.


महा मेट्रोने टीसीएस (TCS -Tata Consultancy Services Limited)च्या माध्यमातून राबविलेल्या या परीक्षेत उत्तीर्ण होण्याकरता तरुणांनी अथक परिश्रम घेतले होते. विविध पदांवर रुजू झालेल्या या अधिकाऱ्यांनी नागपूर मेट्रो प्रकल्पाच्या माध्यमातून नागरिकांना सेवा देण्याचा संकल्प केला. यावेळी या तरुणांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. मेट्रो अधिकाऱ्यांशी सवांद साधताना या तरुण अधिकाऱ्यांनी मेट्रोच्या कार्यबद्दल अनेक प्रश्न विचारले. मेट्रोचे कार्य आधुनिक पद्धतीचे असून या परिवाराचे आपण सदस्य झाल्या बद्दल याचा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. मेट्रोचे संचालक (रोलिंग स्टॉक) सुनील माथूर, संचालक (वित्त) एस शिवमाथन, महाव्यवस्थापक (प्रशासकीय) अनिल कोकाटे, मुख्य प्रकल्प अधिकारी (परिचालन व देखभाल) सुधाकर उराडे, अतिरिक्त महाव्यवस्थापक (मनुष्य संसाधन) रवींद्र धकाते, व्यवस्थापक (मनुष्य संसाधन व प्रशिक्षण) महेंद्र स्वामी यांनी अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन केले.