आर. के. लक्ष्मण यांचे काम 'टाईमलेस' राहील -- नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 'टाईमलेस लक्ष्मण' पुस्तकाचे प्रकाशन


मुंबई दि. 18 : आर. के. लक्ष्मण यांनी व्यंगचित्राद्वारे केलेले काम ‘टाईमलेस’ राहील, असे गौरवोदगार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काढले. व्यंगचित्रकार म्हणून आंतरराष्ट्रीय कीर्ती प्राप्त दिवंगत आर. के. लक्ष्मण अर्थात रासीपुरम कृष्णस्वामी लक्ष्मण यांच्या कारकिर्दीवर आधारित 'टाईमलेस लक्ष्मण' पुस्तकाचे प्रकाशन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज राजभवन येथे करण्यात आले आहे.

यावेळी राज्यपाल चे. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आर. के. लक्ष्मण यांचे नातेवाईक, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले, आर. के. लक्ष्मण यांनी त्यांच्या व्यगंचित्रातून राष्ट्रीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, राजकीय विषयावर भाष्य केले. पण त्यांनी कधीच कुणाला न दुखावता सर्वसामान्यांना नेमके काय वाटते हे आपल्या व्यगंचित्राद्वारे मांडले. त्यांची व्यंगचित्रे हे सर्वसामान्यांना विचार करायला भाग पाडत, यातून त्यांच्या कुंचल्याची ताकद लक्षात येते. लक्ष्मण यांची व्यंगचित्रे ‘समाजशास्त्र’ नेमके काय आहे, हे सांगण्याचे प्रभावी काम करतात. कारण त्यांच्या व्यंगचित्रातून लाखो करोडो ‘कॉमन मॅन’ यांना समाजाबद्दल, समाजात घडणाऱ्या घटना-घडामेाडींबद्दल काय वाटतं,त्यांच्या भावना काय आहेत याचे प्रतिबिंब उमटले आहे. या व्यंगचित्रांनी वेळोवेळी आपल्याला अंत:र्मुख करण्याचे काम केले आहे. आर. के. लक्ष्मण यांनी केलेले काम नवीन पिढीसाठी प्रेरणादायक ठरेल असा विश्वास वाटत असून आता आर. के. लक्ष्मण यांची नात 'कॉमन वुमन'च्या माध्यमातून समोर येत असल्याचा आनंद आहे.

आता कॉमन मॅन ॲनिमेशन स्वरुपात
प्रधानमंत्री म्हणाले, आर. के. लक्ष्मण यांनी काढलेली व्यंगचित्रे आताच्या आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडली जावी अशा सूचना मी आर. के. लक्ष्मण यांच्या कुटुंबियांना केल्या होत्या. मला आनंद वाटतो की, आर. के. लक्ष्मण यांनी काढलेली व्यगंचित्रे डिजिटलाईज करण्यात आली आहेत तसेच येणाऱ्या काळात आर. के. लक्ष्मण यांची व्यंगचित्रे ॲनिमेशनच्या स्वरुपात समोर येणार असल्याचा आनंद आहे.

पद्म पुरस्कारांमध्ये 'कॉमन मॅन'
गेल्या चार वर्षांपासून केंद्र शासनामार्फत देण्यात येणाऱ्या पद्म पुरस्कारांमध्ये ‘कॉमन मॅन’ला स्थान देण्यात आले आहे याचा मला आनंद आहे. कारण संघर्षातून पुढे आलेल्या आणि समाजासाठी मोलाचे योगदान देणाऱ्यांना कॉमन मॅन हे पुरस्कार देण्यात येत असल्याने या पुरस्कारांची परिभाषा बदलली आहे.

आणि कॉमन मॅन विमानातही दिसू लागला..
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात एक किस्सा सांगताना म्हणाले, दिवंगत अटल बिहारी वाजपेयी जेव्हा प्रधानमंत्री होते तेव्हा मी नागरी हवाई उड्डाण मंत्री यांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी मी एक सामान्य कार्यकर्ता होतो. त्यावेळी मी त्यांना सहज सांगितले की,विमानाच्या प्रवेशद्वाराजवळ असलेला महाराजाचा फोटो न लावता तेथे कॉमन मॅनचा फोटो लावण्यात यावा. माझी सूचना प्रधानमंत्री वाजपेयी यांच्यापर्यंत कशी पोहोचली ते माहित नाही पण नंतर काही दिवसानंतर एका विमान कंपनीच्या विमानावर आर. के. लक्ष्मण यांचा कॉमन मॅन दिसू लागला.

निवडक व्यंगचित्रांचा अभ्यास व्हावा
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आर. के. लक्ष्मण यांच्या निवडक व्यंगचित्रांचा अभ्यास केस स्टडी म्हणून करण्याच्या सूचना विदयापीठाला द्याव्यात, असे सांगितले. यामुळे आर. के. लक्ष्मण यांची व्यंगचित्रे सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि मानसिक मनोवृत्तीवर काय फरक करतात हे समजून घेण्यास मदत होईल असे सांगितले.

आर. के. लक्ष्मण यांच्या व्यगंचित्रांचा प्रभाव
आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांचा आपल्यावर खूप प्रभाव आहे. हे सांगताना प्रधानमंत्री म्हणाले, पेपर वाचण्यापूर्वी प्रत्येक राजकारणी आर. के. लक्ष्मण यांनी आपले तर व्यगंचित्र काढले नाही ना हे तपासायचे. आर. के. लक्ष्मण यांनी केवळ सामाजिक परिस्थितीवर भाष्य केले नाही तर त्यातून आपण काय केले पाहिजे हेसुद्धा सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्या व्यगंचित्रातून कुणाला न दुखावता विचार करण्यास भाग पाडण्याची शक्ती त्यांच्या व्यगंचित्रांमध्ये असल्याने ते प्रत्येक भारतीयाला आपलेसे वाटत. आर. के. लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रांमधील कॉमन मॅनचा पोशाख हा सर्व सामान्यांना जोडणारा आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस यावेळी म्हणाले, 'टाईमलेस लक्ष्मण' हे आता पुस्तक स्वरुपात येत आहे याचा आनंद वाटतो. कारण आजही आपण आर. के. लक्ष्मण यांनी कॉमन मॅनच्या स्वरूपात काढलेल्या व्यंगचित्रांशी एकरूप होतो, कारण ही व्यंगचित्रे आपलीच वाटतात. आर. के. लक्ष्मण यांनी सामाजिक,आर्थिक, राष्ट्रीय परिस्थिती व्यंगचित्रांच्या माध्यमातून मांडली. व्यंगचित्रांच्या माध्यमातून गेले अनेक वर्षे आर. के. लक्ष्मण यांनी अनेक पिढ्या जोडण्याचे काम केले आहे.