खड्डे मोजा ,बक्षीस मिळवा

  • राष्ट्रवादी काँग्रेसचे  पोलखोल आंदोलन
  • वाडीतील अंर्तगत मार्गावर पडलेल्या खड्याने वाहनधारक व नागरिक त्रस्त

वाडी ( नागपूर ) / अरूण कराळे
वाडी नगरपरिषदचे अनेक विकासाचे कार्य दुर्लक्षित व आक्षेपार्ह होत असल्यांने नागरिकांमध्ये नाराजीचा सुर असल्याची बाब राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी उघडकीस आणण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे. रविवार २३ डिसेंबर रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या वतीने वाडीत अनेक रस्त्याचे बेहाल झाले असून नागरिक त्रस्त झाल्याने नगर परिषदचे लक्ष वेधण्यासाठी वाडी नगर परिषद पोल खोल आंदोलनाच्या माध्यमातुन रामकृष्ण सभागृह ते विश्राम लॉन पर्यंत खड्डे मोजा ,बक्षीस मिळवा असे अनोखे आंदोलन करून नागरिकांचे दिवसभर लक्ष वेधले .
राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे यांच्या नेतृत्वात पदाधिकारी वसंतराव घडीनकर,डॉ.माल्लेवार,अमित हुसणापुरे,सुनील सेलोकर,सुभाष माने,सौरभ घडीनकर,राम कावळे, वासुदेव कुरडकर,नितीन सावरकर,बबनराव चरपे,नरेश निमजे,मनोज बांते, यांनी नागरिकांच्या तक्रारीवरून रामकृष्ण सभागृह ते विश्राम लॉन मार्ग,अभिजित सोसायटी, आकांक्षा सोसायटी ,हरिओम सोसायटी या नगरातील नागरीकांना सोबत घेऊन मुख्य रस्ता व इतर रस्त्याची पाहणी केली असता रस्ते अत्यंत वाईट अवस्थेत दिसून आले.असंख्य खड्यामुळे रस्ते खड्यात की खड्यात रस्ता हेच समजत नव्हते.या भागातील नागरिकांनी माहिती दिली की या खड्यामुळे अत्यंत त्रासाचा सामना करावा लागत आहे . खड्डा चुकविण्याच्या नादात अपघात घडत आहे .नगर परिषदचे पदाधिकारी व नगरसेवक यांना माहीत असूनही काही दिलासादायक कारवाई करीत नाही.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या या पदाधिकाऱ्यांनी या मार्गावर एक फलक लावून खड्डे मोजा व बक्षीस मिळवा अशी उपहासात्मक घोषणा केली व या फलकावर निषेध स्वरूपात स्वाक्षरी करण्याचे नागरिकांना आव्हान करताच हजारो नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने यावर स्वाक्षरी करून नगरपरिषदचे लक्ष वेधले.या आंदोलनादरम्यान संतोष नरवाडे म्हणाले की सध्या नगर परिषदचे पदाधिकाऱ्यांचे विकास कामात काही तारतम्य दिसून येत नाही .विकास कामे सोडून भाजपची नेते मंडळी मनोरंजनाच्या कामात गुंतली आहे. नागरिकासाठी रुग्णालय,दर्जेदार रस्ते,भीषण पाणी टंचाई,बाजारासाठी जागा,डम्पिंग यार्ड , क्रीडा मैदानावर क्रीडा सुविधा,फायर ब्रिगेड आदी जीवनावश्यक कार्य सोडून फक्त विशिष्ट भागात सिमेंट रोड सोडून बाकी सर्व विकास कामे ४ वर्ष होऊन व आमदार,खासदार तर राज्य, केंद्रात सरकार असूनही काही वाडीच्या जनतेला लाभ दिसून येत नाही.वाडीतील सर्व खराब रस्त्याचा सर्वेक्षण करून ते तातडीने दुरुस्त करावे अशी मागणी त्यांनी केली असून अन्यथा नागरीकांना सोबत घेऊन नगर परिषद मध्ये आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.