तुमच्या खांद्याला खांदा देऊन लढेल- धनंजय मुंडे

महाराष्ट्राची १२ कोटी जनता तुमच्या सोबत - सीमा भागातील मराठी बांधवांना दिला विश्वास
बेळगाव/
 "तुमचं आमचं नातं रक्ताचं आहे, महाराष्ट्राचं आहे. बेळगाव सीमावासीय गेल्या साठ वर्षांपासून महाराष्ट्रात येण्यासाठी लढा देत आहेत, आपल्या लढाईला माझा मानाचा मुजरा. बेळगांवसह संयुक्त महाराष्ट्राची लढाई मतांची नाही तर मातीची आहे." असे म्हणत महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज सीमावासीयांची मनं जिंकली.
गेल्या साठ वर्षांपासून कर्नाटकच्या सीमेलगतचे बेळगावसह सुमारे साडे आठशे मराठी भाषिक गांव महाराष्ट्रात सामील होण्यासाठी धडपडत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीने आज बेळगाव येथे मराठी भाषिकांचा महामेळावा आयोजित केला होता याप्रसंगी धनंजय मुंडे उपस्थित होते.

"कर्नाटक सरकारला अधिकृत दौरा कळवून इथं आलो, त्यांनी प्रोटोकॉल पाळायला नकार दिला पण मी इथे प्रोटोकॉलसाठी नाही तर माझ्या महाराष्ट्रातील मराठी बांधवांसाठी इथे आलो आहे. तुमचं आमचं नातं रक्ताचं आहे, महाराष्ट्राचं आहे. महाराष्ट्राची १२ कोटी जनता तुमच्या सोबत आहे. माझ्या नेत्यांनी म्हणजे शरद पवार साहेबांनी या लढाईत पाठीवर काठी खाल्ली आहे; मी तुम्हांला शब्द देतो की जीवात जीव असेपर्यंत मी तुमच्या हक्कासाठी लढत राहीन. अन्यायी कर्नाटक सरकारला नक्की आपल्या लढ्यापुढे झुकावेच लागेल" असा इशारा मुंडेंनी मेळाव्यात केले.
"गेल्या निवडणुकीत महाराष्ट्र एकीकरण समितीचा एकही उमेदवार निवडून आला नाही. पण, मुळात ही लढाई मतांची नाही तर मातीची आहे, नात्यांची आहे, रक्ताची आहे. कधीही आवाज द्या मी तुमच्यासाठी ऊभा राहीन; मग ते महाराष्ट्राच्या सभागृहात असो की रस्त्यावर, न्यायालयात असो की कोणत्या सरकारसमोर. इथून गेल्यावर बेळगांव प्रश्नी मी त्वरित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. त्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी भाग पाडू" असे म्हणत धनंजय मुंडे यांनी लढ्याची पुढची रुपरेषा घोषीत केली. ही लढाई आता तरुणांनी हाती घ्यावी असे आवाहन ही मुंडे यांनी केले.

या मेळाव्यास एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, अरविंद पाटील, माजी महापौर मालोजी आष्ठेकर, शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे, प्रकाश मरगाळे, राजाभाऊ पाटील, उपमहापौर मधुश्री पुजारी आदी उपस्थित होते.

तर आपल्याच राज्या सोबतही भांडावे लागेल
महाराष्ट्र - कर्नाटक उच्चाधीकार समितीची मागील 4 वर्षात एकदाही बैठक झाली नाही, तसेच तज्ञ समितीची बैठकही झाली नाही.समनव्यक असलेल्या जेष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे असूनही एकदाही बेळगावला आले नाहीत, सरकारचा असाच नकारात्मक भाव राहिला तर आपल्याला कर्नाटक सोबत महाराष्ट्र सरकार सोबतही लढावे लागेल असे कार्यक्रमा नंतर पत्रकारांशी बोलतांना मुंडे म्हणाले.