थर्टी फ़स्टच्या रात्री लॉन, ढाबे महावितरणच्या रडारवर

नागपूर /प्रतिनिधी:


सरत्या वर्षाला 'गुड बाय' आणि नूतन वर्षाचे भरभरून स्वागत करण्यासाठी नागपूर शहर आणि सभोवतालची हॉटेल्स, रिसॉर्ट्स, ढाबे आणि लॉन्स सज्ज झाली आहे. अनेक ठिकाणी मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन केल्या जात आहेत. ह्या कार्यक्रमात वीजेचा अनधिकृत वापर होऊ नये यासाठी महावितरणने विशेष उपाययोजना केल्या असून हा आनंद साजरा करताना वीजेचा अधिकृत वापर करण्याचे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

नागपूर शहर आणि लगतच्या परिसरात अनेक लॉन, हॉटेल्स, रिसॉर्टस आणि ढाब्यांवर मनोरंजनासोबतच गायन, नृत्य, डीजे, बॉलिवूड नाईट, डिस्को, जॉझ, पॉप, इंटरनॅशनल साँग्स, पार्टीज, लाईव्ह बॅण्ड यासारख्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन केल्या जात आहेत, अश्या कार्यक्रमांप्रसंगी अनेक ठिकाणी चोरीची वीज वापरल्या जात असल्याची माहिती असून त्यावर निर्बंध घालण्यासाठी महावितरणने अनेक उपाययोजना केल्या आहेत. अश्या कार्यक्रमाप्रसंगी वीजचोरी आढळल्यास गुन्हा दाखल करण्यासोबतच संबंधित आयोजकाचा परवाना रद्द्बातल करण्यासाठी शासकीय यंत्रणेकडे पाठपुरावाही केला जाणार असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

शहराबाहेरील अनेक ढाबाचालक ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी महामार्ग व रस्त्यांवर चोरीच्या वीजेवर आकर्षक रोषणाई करीत असल्याचीही माहिती असून मंडप डेकोरेशन व्यावसायिकांकडून वीज तारांवर आकडे टाकून देण्याची व्यवस्था केली जात असल्याचेही कळते, अश्या ढाबा आणि मंडप डेकोरेशन व्यावसायिकांवर कठोर कारवाईसोबतच त्यांचाही व्यावसायिक परवाना रद्द करण्यासाठी संबंधित यंत्रणेकडे पाठपुरावा करण्याबाबत महावितरणची आग्रही भुमिका राहील.

सामाजिक सुरक्षाही महत्वाची 
31 डिसेंबरच्या रात्री बरेचदा रस्त्यावर होत असलेल्या हुल्लडबाजीचा फ़टका परिसरातील वीज ग्राहकांनाही होत असतो, फ़टाक्यांची आतिषबाजी, बेधुंद वाहन चालकांमुळेही अनेकदा वीज वितरण यंत्रणेचे नुकसान होण्यासोबतच जीवित व वित्त हानी होण्याचा धोका असल्याने याबाबत आवश्यक ती खबरदारी घेण्यासोबतच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आयोजित कार्यक्रमस्थळी वीज उपकरणांची योग्य तपासणी करून घ्या, या सार्वजनिक कार्यक्रमाच्या आयोजनादरम्यान मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य नागरिक सहभागी होतात, त्यांच्या आनंदावर विरजण पडू नये, कुठलीही अप्रिय घटना होऊ टाळून त्यांना कार्यक्रमाचा आनंद घेता यावा यासाठी आयोजकांनी योग्य ती खबरदारी घेणेही आवश्यक आहे. सोबतच अश्या कार्यक्रमांसाठी वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे आवश्यक आहे, वीजपुरवठा बंद असतांना जनरेटर सुरु केल्यास एकाच न्यूट्रलमुळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब बाहिनीत प्रवाहीत झाल्याने प्राणांकीत अपघात होण्याची शक्यता असते. जवळच्या वीजखांबावरून किंवा वीजवाहिन्यांवर आकोडे टाकून वीजपुरवठा घेऊ नये, यामुळे जीवित व वित्त हानी होण्याचा धोका अधिक आहे. वीज जोडणीसाठी लागणारी तार किंवा केबल विजेचा भार पेलण्यास सक्षम असल्याची खातरजमा करावी, तुटलेली किंवा लूज तार वापरू नये आणि वापरायची असल्यास प्रमाणित इन्सूलेशन टेप लाऊन जोडावी, असे आवाहन महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.

31 डिसेंबर हा आनंदाचा उत्सव असून या दिवशी उत्सवप्रेमींच्या आनंदात विघ्न पडू नये यासाठी अधिकृत वीजेचाच वापर करण्यात येऊन आनंद व्दिगुणित करण्याचे आवाहनही महावितरणतर्फ़े करण्यात आले आहे.