शिवनेरीसह, जुन्नर मध्ये साकारनार प्राचीनवस्तू संग्रहालय

डेक्कन कॉलेज, खा.आढळराव,सह्याद्री गिरीभ्रमन संस्थेचे प्रयत्न 

जुन्नर /आनंद कांबळे:

शिवजन्मभूमी महाराज किल्ले शिवनेरीवर  तसेच जुन्नर शहरात  प्राचीन वस्तु आणि शिवकालीन शस्रास्र संग्रहालय साकारणार आहे.  आणि डेक्कन कॉलेजच्या वतीने भारतीय पुरातत्व विभागाच्या माध्यमातून जुन्नरच्या सह्याद्री गिरिभ्रमण संस्था  सहकार्याने हे संग्रहालय उभारण्यात येणार आहे.

शिवनेरी संवर्धन आणि विकास प्रकल्पा अंतर्गत सुमारे ८६ कोटी रुपयांचा विकास प्रकल्प राज्य शासनाच्या विविध विभागांद्वारे २००२ पासून सुरु आहे.शिवकालीन दुर्गबांधनीचे  मॉडेल फोर्ट म्हणून किल्ले शिवनेरीचे संवर्धन करण्यात येत आहे.

या प्रकल्पामुळे शिवनेरीला भेट देणाऱ्या  दुर्गप्रेमी पर्यटक आणि शिवप्रेमींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जुन्नर तालुक्याला इ.स.पूर्व इतिहास असून, या इतिहासाची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळत नाही. यामुळे शिवनेरी किल्ल्यावर पर्यटकांना आकर्षण वाटेल असे   प्राचीन वस्तु आणि शिवकालीन शस्रास्र संग्रहालय     उभारावीत अशी मागाणी होती.

शिवनेरीवरील अंबरखाना इमारती मध्ये कायमस्वरुपी माहिती केंद्र आणि शिवकालीन शस्रास्र संग्रहालय उभारण्यात यावे अशी मागणी १९ फेब्रुवारी २००७ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याकडे  जुन्नरमधील सह्याद्री गिरिभ्रमण संस्थेने केली होती. अशी माहिती संस्थचे अध्यक्ष संजय खत्री यांनी दिली. 

तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संग्रहालयाला मान्यता दिली होती. भारतीय पुरात्तव विभागाचे जुन्नर विभागाचे संरक्षक सहाय्यक बी.बी.जंगले यांनी  अंबरखाना इमारतीच्या संवर्धनाला सुरुवात केली. मात्र  हा प्रस्ताव पुढे बाजूला पडला.

खा. शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राज्य शासनाबरोबर, विद्यमान केंद्रिय सांस्कृतिक मंत्री महेश शर्मा आणि भारतीय पुरातत्व विभागाच्या महासंचालिका उषा शर्मा यांचे बरोबर संग्रहालयाबाबत पाठपुरावा  केला. 

यानंतर डेक्कन कॉलेजचे कुलगुरु डॉ.वसंत शिंदे यांनी शिवनेरी सह जुन्नर शहरात देखील पुरातत्व वस्तु संग्रहालय उभारण्याबाबत नियोजन केले.  संग्रहालयासाठी  डॉ. शिंदे यांनी  जुन्नर नगर पालिकेच्या  जिजामाता उद्याना शेजारील जुन्या विश्रामगृहाची  जागा देण्याची मागणी नगर पालिकेकडे केली आहे.

जुन्नरचे  नगराध्यक्ष शाम पांडे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच जागा डेक्कन कॉलेजला  सदर जागा हस्तांतरीत  करण्याची तयारी दर्शविली असल्याचे डॉ. वसंत  शिंदे यांनी सांगितले. 

पुढील महिन्यात  शिवनेरीवरील शिवजयंती सोहळ्यात संग्रहालयाबाबत मुख्यमंत्री सकारात्मक घोषणा करतील, यासाठी आम्ही पाठपुरावा करत  आहोत.

- संजय खत्री अध्यक्ष, सह्याद्री गिरिभ्रमण संस्था, जुन्नर 


किल्ले शिवनेरीवरील  अंबरखाना ही वास्तू वापरात येऊन चांगले संग्रहालय झाले तर हे दुर्गप्रेमी  पर्यटकांसाठी मार्गदर्शक  माहिती केंद्र होईल. त्याच्या कार्यवाहीसाठी  केंद्र, राज्य सरकारसह विविध विभागांशी पत्रव्यवहार करीत आहे. 

- खासदार शिवाजीराव आढळराव पाटील 

जुन्नर शहर 2000 वर्षांपूर्वी  सातवाहनांची साम्राज्याची  पहिली राजधानी होती. सातवाहन साम्राज्याचे   रोमन आणि ग्रीक लोकांबरोबर व्यापारी संबंध होते.डेक्कन कॉलेजच्या माध्यमातून जुन्नर मध्ये   उत्खनन करण्यात आलेले आहे.सुमारे2000वर्षांपूर्वीच्या प्राचीन तसेच शिवकालीन  लोकसंस्कृतीची माहिती व्हावी, यासाठी संग्रहालयासाठी आम्ही विशेष प्रयत्न करत आहोत.

- डॉ. वसंत शिंदे 

कुलगुरू, डेक्कन कॉलेज (अभिमत विद्यापीठ) 

जुन्नर मध्ये प्रस्तावित असलेल्या    प्राचीनवस्तू संग्रहालयासाठी जागा तसेच   आवश्यक ती  प्रशासकीय पूर्तता करण्यासाठी जुन्नर नगरपालिकेच्या वतीने सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल.--

शाम पांडे,नगराध्यक्ष जुन्नर नगर पालिका