भारताला विश्वगुरु करण्यासाठी माहेश्वरी युवकांनी योगदान द्यावे

  • जोधपूरच्या अधिवेशनात मुख्यमंत्र्यांचे आवाहन


मुंबई, दि. 6: आपल्या समाजापलीकडे जाऊन अन्य समुदायांसह राष्ट्रासाठी सातत्याने योगदान देणारा समाज म्हणून माहेश्वरी समाजाची ओळख आहे. विश्वगुरु होण्याच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या देशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी या समाजातील नवउद्योजक युवकांनी हातभार लावावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज जोधपूर येथे केले.

राजस्थानातील जोधपूर येथील पोलो मैदानावर दि. 4 ते 7 जानेवारी 2019 या कालावधीत माहेश्वरी महाकुंभ हे माहेश्वरी समाजाचे आंतरराष्ट्रीय महाअधिवेशन व ग्लोबल एक्स्पो होत आहे. आज या अधिवेशनात प्रमुख उपस्थित म्हणून मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. या अधिवेशनात आज लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, श्री. फडणवीस व केंद्रीय कृषी राज्यमंत्री तथा स्थानिक खासदार गजेंद्रसिंह शेखावत यांच्या मुख्य उपस्थितीत माहेश्वरी समाजातील 42 प्रतिभावंतांचा सन्मान करण्यात आला. जोधपूरचे महापौर घनश्याम ओझा, उपमहापौर देवेंद्र सालेचा, भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्याम जाजू, अखिल भारतवर्षीय माहेश्वरी महासभेचे सभापती शामसुंदर सोनी, महामंत्री संदीप काबरा आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

देश-विदेशातून आलेल्या माहेश्वरी समाजाच्या हजारो प्रतिनिधींना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, माहेश्वरी समाजाने स्वत:च्या समाजासह अन्य समुदायांसाठी देखील व्यवस्था उभी केली आहे. लोकहितकारी कामांमध्ये अग्रेसर असलेला हा समाज दानशूर म्हणून ओळखला जातो. देशाच्या विकासामध्ये नेहमीच भरीव योगदान देणाऱ्या या समाजात उद्योजक आणि बुद्धिवंतांची संख्या मोठी आहे. जगातील सहाव्या क्रमांकाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आपला देश येत्या काही वर्षांमध्ये तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वेगाने कूच करतो आहे. अशावेळी त्यासाठी होत असलेल्या प्रयत्नांमध्ये, नोकरी मागण्याऐवजी उद्योग-व्यवसाय उभारुन रोजगार देऊ शकणारा माहेश्वरी समाज महत्त्वाचा हातभार लावू शकतो. त्यादृष्टीने अधिवेशनात आयोजित ग्लोबल एक्स्पोचा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

अधिवेशनातील युवा उद्योजकांची लक्षणीय संख्या पाहून मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रोत्साहित करीत पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले. जगातील इतर देशांच्या तुलनेत, भविष्यामध्ये भारतातील तरुणाईची संख्या लक्षणीय राहणार असून जगाला मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यामध्ये भारताची सर्वात मोठी भूमिका राहणार आहे. आपल्या देशातील तरुणांमध्ये ज्ञान, गुणवत्ता, कौशल्य आणि क्षमता उपलब्ध असून त्यांना योग्य संधी व पुरेसे वित्तीय भांडवल मिळाले तर सर्वांना अपेक्षित असा सुजलाम्‌ सुफलाम्‌ भारत साकारलेला दिसेल. जगाची अर्थव्यवस्था बदलती असून माहिती तंत्रज्ञानाच्या पुढे जाऊन आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा सर्वत्र बोलबाला आहे. त्याआधारे एखादी लहानशी स्टार्टअप कंपनी छोट्या कालावधीमध्ये बिलियन डॉलर बिझनेस ग्रुप होऊ शकतो, हे लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून स्टार्ट अपना प्रोत्साहित करणारी इको सिस्टीम प्रयत्नपूर्वक विकसित करण्यात येत आहे. भारताला विश्वगुरु बनविण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी युवा भारताचा रोडमॅप तयार केला आहे. या मार्गावर सर्वांनी मिळून एकसंघ वाटचाल करणे आवश्यक आहे, तरच हे लक्ष्य गाठता येईल. त्यादृष्टीने माहेश्वरी समाजाने यापुढेही व्यापक लोकहितकारी कार्य सुरु ठेवावे, नवोन्मेषी उद्योजकांना सहाय्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.

माहेश्वरी समाजाने युवा प्रतिभावंतांचा आणि ज्येष्ठ मार्गदर्शकांचा यावेळी सन्मान केला. हा धागा पकडून मुख्यमंत्री म्हणाले की, ज्येष्ठांचा आदर व सन्मान करण्याची शिकवण यातून युवा पिढीला मिळाली आहे. बुजुर्गांना विसरणाऱ्या समाजाला वर्तमान असते पण भविष्य नसते. या महाअधिवेशनातून माहेश्वरी समाजाचे कर्तृत्ववान चरित्र आणि उज्ज्वल चित्र यांचे प्रतिबिंब दिसल्याचा गौरवपूर्ण उल्लेखही मुख्यमंत्र्यांनी भाषणाच्या अखेरीस केला.