चांदा ते बांदा योजनेतून चंद्रपूर जिल्हयात स्वीट क्रांतीची सुरुवात

पोंभूर्णाच्या मध उत्पादनाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळावी: ना.सुधीर मुनगंटीवार



चंद्रपूर, दि.6 जानेवारी - चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा येथे आज सुरू होत असलेल्या मधुमक्षिका प्रकल्पाच्या माध्यमातून पोंभूर्णाला मध निर्मितीमध्ये आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण करून द्या, असे आवाहन राज्याचे वित्त, नियोजन व वने मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी आज येथे केले. चंद्रपूर जिल्हयातील पोंभुर्णा येथे चांदा ते बांदा योजनेतून या प्रकल्पाला सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पाच्या माध्यमातून तालुक्यातील शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध केला जाणार आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा या तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी टुथपिक व अगरबत्ती उद्योगानंतर आज मधुमक्षिका पालनाच्या प्रशिक्षणाला व पेटी वाटपाला सुरुवात झाली. महाराष्ट्र शासनाच्या वन विभाग चंद्रपूर व समर्थ वूमेन्स वेल्फेअर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम होत आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेकडील चंद्रपूर जिल्ह्याला कोकणातील रत्नागिरी जिल्ह्याच्या संस्थेमार्फत मदत केली जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून मधनिर्मितीच्या पारंपारिक पद्धतीला तांत्रिक व आधुनिक जोड दिली जाणार आहे. आज या संदर्भातील प्रशिक्षणाला शेकडो महिलांच्या उपस्थितीत सुरूवात झाली.

चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील जनतेला बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रानंतर अगरबत्ती निर्माण केंद्र, टूथपिक निर्माण केंद्र, अशा अनेक व्यवसायाची जोड दिली जात आहे. 1 हजार आदिवासी महिलांची अंडी उत्पादनाची कंपनी कार्यान्वित झाली आहे. पोंभूर्णा तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये नजीकच्या काळात आरो मशीन लागणार आहेत. तालुक्यातील ज्या महिलांना उज्वला गॅस योजनेमध्ये जोडणी मिळाली नसेल त्यांना वनविभागाच्या माध्यमातून गॅस जोडणी देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पोंभूर्णाच्या एमआयडीसीला सुरुवात होत असून या ठिकाणी पर्यावरण पूरक व्यवसाय निर्मिती व्हावी यासाठी आयआयटी पवईची मदत घेतली जात आहे. 30 नव्या दमाच्या उद्योजकांच्या उद्योगाला चालना दिली जाणार आहे. या एमआयडीसीमधून सोलर पॅनल निर्मितीच्या प्रकल्पाला देखील सुरुवात होईल. प्लॉस्टिक बंदी नंतर बचत गटांच्या माध्यमातून कापडी पिशव्या निर्माण करण्यासाठी 20 लाखांची तरतूद जिल्हा नियोजन आराखडयात करण्यात आली आहे. या तालुक्यामध्ये 612 विहिरी देण्यात आल्या असून आता प्रत्येक गावांमध्ये पाणी अडवा पाणी जिरवा मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी बंधारा निर्मितीचा प्रकल्प हाती घेतला जाईल. या तालुक्यातील शेतकऱ्यांना आधुनिक शेती करता यावी यासाठी प्रत्येक पाच गावांच्या मागे एक शेतकरी मित्र नियुक्त केल्या जाईल. या शेतकरी मित्राच्या माध्यमातून विद्यापीठाचे तंत्रज्ञान शेतकऱ्यांना दिले जाईल. बचत गटांना नर्सरी करण्यासाठी प्रोत्साहित केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी गेल्या चार वर्षांमध्ये पोंभूर्णाचा कायापालट झाल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले, पोंभूर्णाचे बस स्टँड ,रुग्णालय, राजराजेश्वर मंदिर परिसरातील विकासकामे, तहसील कार्यालय, ईको पार्क, नगरपंचायत इमारत आदी पायाभूत सुविधा पूर्णत्वाकडे येत आहेत. पोंभूर्णा नजीक पोलीस प्रशिक्षण केंद्र ही तयार होत आहे. तथापि, या विकासासोबतच तालुक्यामध्ये प्रत्येकाच्या हाताला काम मिळावे. यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळेच मधुमक्षिकापालनातून ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेला गती देण्याचा हा एक प्रकल्प असून यामध्ये तालुक्याने पुढाकार घ्यावा, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले. पोभुर्णा येथील मध निर्मितीला आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी शेवटी व्यक्त केली.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सभापती अलका आत्राम यांनी केले. यावेळी माजी आमदार बाळ माने यांनी देखील संबोधित केले. राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे कोकण आणि पूर्व विदर्भ एकत्रित एका प्रोजेक्टवर काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. कोकणातली ही योजना आपल्या जिल्ह्यात राबवावी यासाठी प्रचंड पाठपुरावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला. त्यामुळे हा प्रकल्प यशस्वी करावा, या भागात स्वीट क्रांतीला सुरुवात करावी, असे आवाहन यावेळी उपस्थित शेकडो महिलांना त्यांनी केले.

या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर रत्नागिरीचे माजी आमदार माने, पोंभूर्णाच्या सभापती अलका आत्राम, नगर पंचायत अध्यक्ष श्वेता वनकर, सहायक वनसंरक्षक व्ही.एस. मोरे, उपनगराध्यक्ष रजिया कुरेशी उपसभापती विनोद देशमुख, गंगाधर मडावी, ज्योतीताई बुऱ्हांडे, तसेच या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रशिक्षण देणाऱ्या उद्योजिका राजश्री विश्वासराव यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन नरेश कुमार बोरीकर यांनी केले.