आमदाबाद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी घेतले व्यवहार ज्ञानाचे धडे


  •  ज्ञानरचनावादी अभ्यासक्रमानुसार बालआनंद मेळावा 
  • आठवडे बाजाराचे आयोजन,  चिमुरड्यांनी अनुभवली खरेदीविक्री

अण्णापूर- पुणे (प्रतिनिधी  )-शालेय जिवनातच विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळावे. व्यवसाय करताना वस्तू खरेदी करून ती वस्तू नफ्यात कशी विकावी हे कौशल्य प्राप्त व्हावे, तसेच ग्राहकांशी कसे बोलावे? आपली वस्तू कशी चांगली आहे हे पटवून देण्याची कला विद्यार्थ्यांनी आत्मसात करून घ्यावी. त्याचबरोबर मुलांना व्यवहार ज्ञान प्राप्त व्हावे या उद्देशाने आमदाबाद येथील जिल्हा परिषद शाळेत बाल आनंद मेळावा व आठवडे बाजार भरवला होता. शेजारच्या मलठण गावचा आठवडे बाजार मंगळवारीअसतो. मात्र, तत्पुर्वी एक दिवस अगोदर आमदाबादच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत सोमवारी (दि.७ जानेवारी ) सकाळी बाजार भरल्याने एकच किलबिलाट झाला. शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक व शिक्षकांनी काही दिवस आधी विद्यार्थ्यांना कल्पना दिल्याने या आठवडे बाजाराला मोठा प्रतिसाद मिळाला. या बाजारात प्रामुख्याने सध्या शेतात असलेली पिके जास्त प्रमाणात दिसून आली.
कांदा, कांद्याची पात, कोथिंबीर, पालक, वांगी, मिरची, गवती चहाची पाने, हरभरा, चिंचा इत्यादी शेतमाल त्याचबरोबर कागदाच्या वस्तू, विविध खाद्यपदार्थ विक्री करिता मुलांनी  आणले होते. या बाजाराचे उद्घाटन आमदाबादचे माजी सरपंच योगेश थोरात व त्यांच्या सुविद्य पत्नी स्नेहल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदाबादच्या सरपंच लता न-हे, उपसरपंच जिजाबाई माशेरे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक रंगनाथ थोरात, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष नितिन थोरात, माजी अध्यक्ष पोपटराव जाधव , माजी उपसरपंच संदिप जाधव, पदवीधर शिक्षक संघटनेचे सल्लागार गंगाराम थोरात , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  दत्तात्रय साळवे,माजी ग्रामपंचायत सदस्य अविनाश सोनार , मलठण केंद्राचे केंद्रप्रमुख रामदास बोरुडे यांचेसह गावातील प्रमुखांनी भेटी देऊन शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक करत खरेदीचा आनंद लुटला.. शाळेचे मुख्याध्यापक जनार्दन फलके, पदवीधर शिक्षक सुनिता जगताप  यांनी उत्तम नियोजन  केले. तर पदवीधर शिक्षक मनोज गांधी  यांनी आभार मानले. शाळेचे सहशिक्षक आबा पवार,शिक्षक समितीचे सरचिटणीस नामदेव गायकवाड यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. एकंदरीत पाठ्यपुस्तकातील ज्ञानाचा व्यवहारात यशस्वी उपयोग करण्यासाठी आमदाबाद शाळेने राबविलेल्या आठवडे बाजार सारख्या उपक्रमाचा निश्चित फायदा होईल यात तिळमात्र शंका नाही.  

[ चौकट - वाण म्हणून पुस्तके वाटप.
शाळेतील आठवडे बाजार निमित्त शाळेतील शिक्षक  व व्यवस्थापन समितीने  हळदी-कुंकवाचा कार्यक्रमही केला. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी वाण म्हणून पुस्तके वाटप करण्यात आली.  शाळेच्या वतीने महिला शिक्षिका सुनिता जगताप, विद्यार्थी यांच्या हस्ते आलेल्या प्रत्येक महिला पालक व गावातील शाळेला भेट देणाऱ्या महिलांना पुस्तकरुपी वाण देण्यात आले. यावेळी माजी सरपंच योगेश थोरात, तसेच विद्यमान सरपंच लता न-हे यांनी मराठी माध्यमांच्या शाळांमध्ये आपल्या पाल्यांना पाठवण्याचे आवाहन यावेळी केले. पदवीधर शिक्षक मनोज गांधी यांनी  शाळेने राबवलेले विविध उपक्रम व मुलांच्या प्रगतीबद्दल माहिती उपस्थित पालकांना दिली.
[आमदाबाद (ता.शिरुर ) बाल आनंद मेळावा अंतर्गत येथील प्राथमिक शाळेत आयोजित आठवडे बाजार खरेदीचा आनंद लुटताना केंद्रप्रमुख रामदास बोरुडे,व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय साळवे , सुनिता जगताप,मनोज गांधी,जनार्दन फलके व पालक व ग्रामस्थ.]