पद्मभूषण राम सुतार हे भारताचे अनमोल “कोहिनूर”

त्यांच्या हातून देशाला गौरवांकित करणारे काम - सुधीर मुनगंटीवार

मुंबई दि. 16 : आंतरराष्ट्रीय शिल्पकार पद्मभूषण राम सुतार हे भारताचे कोहिनूर असून आमच्याकडे असलेला हा ‘कोहिनूर’ अनमोल आहे, त्यांनी आपल्या कलेतून भारत देशाच्या गौरवात भर टाकण्याचे काम सातत्याने केले आहे, असे गौरवोद्गार अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काढले.

श्री. मुनगंटीवार यांच्या हस्ते पद्मभूषण राम सुतार यांचा काल सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास आमदार मंगलप्रभात लोढा, अनिल सुतार, श्रीमती सीमा रामदास आठवले, श्रीमती मंजू मंगलप्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

राम सुतार यांनी जगातील सर्वात उंच असा सरदार वल्लभभाई पटेल यांचा “स्टॅच्यू ऑफ युनिटी” चा पुतळा निर्माण करून भारताची जगातील ऊंची वाढवली असे सांगून श्री. मुनगंटीवार म्हणाले, आजपर्यंत श्री. सुतार यांनी जे पुतळे निर्माण केले ते फक्त हातांनी नाही तर हृदयापासून बनवले असल्याने ते आपल्याशी बोलतात. ही ईश्वरीय देणगी त्यांना लाभली आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांचा उत्साह आणि त्यांच्या हातातील कला इतरांसाठी प्रेरणादायी आहे. समाजाला सुंदर बनवणाऱ्या अशा व्यक्तींचा जेव्हा गौरव केला जातो तेव्हा इतर कलाकारांनाही त्यातून प्रेरणा मिळत असते. आता ते अयोध्येत श्रीरामाचा पुतळा बनवणार आहेत. एक राम दुसऱ्या श्रीरामाचा पुतळा निर्माण करत आहे. राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिल्पकार आहेत. महाराष्ट्राच्या या सुपुत्राचा गौरव करताना आपल्याला खूप आनंद वाटतो असेही श्री. मुनगंटीवार यावेळी म्हणाले.

सत्कारमूर्ती राम सुतार यांनी आपल्या मनोगतात हातातील कला ही विश्वकर्म्याची देण असल्याचे सांगितले. कामाचे होत असलेले कौतुक हे प्रेरणादायी असून 1947 पासून आपण हे काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात ऊंच पुतळा निर्माण करण्याची संधी मिळाली हे आपले भाग्य आहे, असेही ते म्हणाले.
कार्यक्रमात श्रीमती आठवले आणि श्रीमती लोढा यांनी ही आपले मनोगत व्यक्त केले. राम सुतार यांचे पुत्र अनिल सुतार यांचाही अर्थमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.