ओबीसीतील गुणवंतांचा स्व.वसंतराव नाईक पुरस्काराने गौरव होणार

मुंबई/प्रतिनिधी:

राज्यातील 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत राज्यातून व विभागातून सर्वप्रथम येणाऱ्या इतर मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार प्रदान करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
सध्या राज्यातील विमुक्त जाती व भटक्या जमातीतील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्काराने गौरविण्यात येते. याच धर्तीवर इतर मागास प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याअंतर्गत इतर मागास वर्गातील इयत्ता 10 वी आणि 12 वी मध्ये राज्यात सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनीस प्रत्येकी 1 लाख, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र तर विभागातून सर्वप्रथम येणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना प्रत्येकी 51 हजार स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे.