चंद्रपूरच्या १२ शेतकऱ्यांनी साधला मुख्यमंत्र्यांसोबत संवाद

चंद्रपूर/प्रतिनिधी:

 चंद्रपूर जिल्ह्यातील एका सुशिक्षित शेतकऱ्याने नोकरी सोडून शेतीमध्ये केलेल्या अभिनव प्रयोगाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुकाची थाप दिली आहे. वर्षाला लक्षावधी रुपये कृषी यांत्रिकीच्या साह्याने मिळवत असलेल्या विनोद मारुती कोटकर यांना वाह !छान शेती करता तुम्ही !अशा शब्दात त्यांनी शाब्बासकी दिली.

महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषी व कृषी संलग्न क्षेत्रातील योजनांचा कशा पद्धतीने लाभ होतो. यासंदर्भात लाभार्थ्यांसोबत आज महासंवाद या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या मुंबईतील स्टुडिओ मधून संपर्क साधला. जवळपास तीन तास त्यांनी शेतकऱ्यांशी वार्तालाप केला.

आज मुख्यमंत्र्यांशी ज्यांची चर्चा झाली त्यामध्ये उसगाव येथील मंगेश मारुती आसुटकर, चोरगाव येथील पांडुरंग गोपाळ कोकोडे, चारगाव येथील मधुकर चिंधुजी भलमे, दादापूर येथील विनोद मारुती कोटकर, शेगाव येथील पंचफुला सुखदेव गायकवाड, वडगाव येथील विक्रम मारोती भोयर, पाटाळा येथील संदीप मुकुंदराव एकरे, चिरादेवी येथील लक्ष्मण नानाजी वासेकर, चकबापूर येथील गजानन विठोबा काळे, मोहबाडा येथील दत्तू विठ्ठल कापसे, शेगाव येथील सखुबाई मधुकर दोहतरे, वेंडली येथील नंदा शंकर पिंपळशेंडे यांचा समावेश होता.

या वेळी विनोद कोटकर यांनी एका कंपनीतील नोकरी सोडून स्वतःच्या शेतीमध्ये राबायला कशी सुरुवात केली आणि बीएससी एग्रीकल्चर असल्यामुळे त्याच्या ज्ञानाचा त्यांना कसा फायदा झाला, याबाबतची माहिती दिली. श्री. विनोद यांनी शेडनेट हाऊस उभारणी करून त्यामध्ये कारले व काकडी याचे उत्पादन घेतले आहे. भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात ते उत्पादन घेतात. सुरुवातीला बैलजोडीवर शेती करणारे विनोद यांनी ट्रॅक्टर घेतल्यामुळे त्यांच्या शेतीमध्ये यांत्रिकीकरणाला अधिक महत्त्व दिल्यामुळे त्यांची झालेली बरकत व त्यामुळे अन्य शेतकऱ्यांना मिळालेली प्रेरणा याबाबतही मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

सोबतच दुसरे शेतकरी मधुकर चिंधुजी भलमे यांच्याशी देखील संवाद साधला. भलमे यांनी पांदण रस्ते बनवितांना शेततळ्यातील मुरूम वापरण्यात यावा, त्यामुळे शेततळे खोलीकरण सहज शक्य होईल अशी एक सूचना केली. तसेच प्रत्येक पुलाला पूल कम बंधारा करावा, जेणेकरून पावसाचे पाणी मोठ्या संख्येने कमी खर्चात अडविले जाईल, अशी विनंती देखील मुख्यमंत्र्यांकडे केली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात झालेल्या या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये एकत्रित आलेले सर्व शेतकरी कुठल्या ना कुठल्या योजनेचे लाभार्थी होते. मात्र या प्रत्येकाची एक यशकथा होती. आणि ही यशकथा त्यांना मुख्यमंत्र्यांना सांगायची होती. मुख्यमंत्री महोदयांनी राज्यभरातील सर्व जिल्ह्यांशी संपर्क साधल्यामुळे काही मोजक्या लोकांशी त्यांना बोलता आले. तथापि,थेट मुख्यमंत्र्यांशी बोलायला भेटल्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर होता.

या सर्व शेतकऱ्यांनी अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या यशकथा ऐकण्याची संधी मिळाल्याबद्दल चंद्रपूर जिल्हा प्रशासनाचे आभार व्यक्त केले. जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी या व्हिडिओकॉन्फरसिंग नंतर सहभागी झालेल्या सर्व शेतकऱ्यांना सहभागाचे प्रमाणपत्र देत त्यांचे कौतुक केले. शेतकऱ्यांनी मनमोकळेपणे मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्याबद्दल त्यांचे आभारही मानले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डॉ .उदय पाटील यावेळी उपस्थित होते.