मुंबईत जागतिक भागिदारी परिषद १२-१३ जानेवारीला

  • · उपराष्ट्रपती यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन
  • · ४० देशातील सुमारे १ हजार प्रतिनिधींची उपस्थिती
  • · केंद्र शासन, राज्य शासन आणि सीआयआय यांच्या संयुक्त विद्यमाने २५ वी जागतिक परिषद.
  • · मुंबईला प्रथमच आयोजकाचा मान
  • · केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू आणि राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली माहिती

मुंबई, दि. ६ : येत्या १२ आणि १३ जानेवारी २०१९ रोजी मुंबईतील जे डब्ल्यू मेरियेट हॉटेलमध्ये जगातील सुमारे ४० देशातील उद्योजक एकत्र येणार आहेत. केंद्र शासन, राज्य शासन आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने २५ वी जागतिक भागिदारी परिषद आयोजित करण्यात आली आहे. मुंबईला प्रथमच आयोजक होण्याचा मान मिळाला आहे. या परिषदेचे उद्घाटन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी श्री. देसाई म्हणाले, या जागतिक परिषदेचे आयोजक होण्याचा मान राज्याला मिळाला ही आनंदाची बाब आहे. यापूर्वी झालेल्या ‘मेक इन इंडिया’ आणि ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ परिषदेला देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता. या परिषदेत झालेल्या सामंजस्य करारांमुळे राज्यात उद्योगांना चालना मिळाली आहे. आगामी परिषदेसाठीदेखील राज्य सज्ज असून ही परिषद सर्वांच्या सहकार्याने यशस्वी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

श्री. प्रभू म्हणाले, महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी अत्यंत अनुकूल वातावरण आहे. देशाने येत्या काही वर्षात १०० अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक आणण्याचे ध्येय निश्चित केले आहे. त्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. ‘इज ऑफ डुईंग बिजनेस’साठी देश किंवा राज्य घटक न मानता जिल्हा घटक मानून नियोजन करण्यात येत आहे. जिल्ह्यांचा विकास करून पर्यायाने राज्याचा आणि देशाचा विकास होणार आहे. देशाची अर्थव्यवस्था ट्रिलीयन डॉलरकडे वाटचाल करीत आहे. यासाठी उत्पादन, सेवा, कृषी, पर्यटन आणि निर्यात यासारख्या क्षेत्राच्या वाढीसाठीचे नियोजन करण्यात आले आहे. या सर्व प्रयत्नांची चर्चा आणि प्रदर्शन हे या जागतिक भागिदारी परिषदेत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सीआयआयचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी यांनी या परिषदेची रूपरेषा आणि पार्श्वभूमी सांगितली.