प्रमाणित वाणाचीच लागवड करा:शेंडे

चंद्रपूर/प्रतिनिधी:

पिकांवर रोंगाचे प्रमाण वाढणे, रोपे बरोबर न येणे यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. दिवसेंदिवस असे प्रकार वाढत असून, यासाठी शेतकऱ्यांनी सावध होणे आवश्यक आहे. रोपे लावण्यापूर्वी किंवा लागवडीपूर्वी वाणाची शहानिसा करणे आवश्यक असून, शेतकऱ्यांनी कृषी विभागाने प्रमाणित केलेले. नोंदणीकृत वाणाची नागवड करावी, असे आवाहन सिंदेवाही कृषी विज्ञान केंद्राचे संशोधक पी. व्ही. शेंडे यांनी केले. कृषी महोत्सवात धानपिक लागवड या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. 

चंद्रपूर येथील चांदा क्लब ग्राऊंडवर जिल्हास्तरीय कृषी व सरस महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. काल सोमवारी दुपारी 1 वाजता धानपीक लागवड या विषयावर शेंडे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. 
शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी कृषी विद्यापीठाने प्रत्येक जिल्ह्यात कृषी संशोधन केंद्राची निर्मिती केली. चंद्रपूर जिल्ह्यात सिंदेवाही येथे कृषी संशोधन केंद्र आहे. शेतकऱ्यांनी एकदा तरी या कृषी विज्ञान केंद्राला भेट देऊन पाहणी करावी, पीक लागवड, आधुनिक तंत्रज्ञान, अन्य उत्पादन, माती परीक्षण याबाबतची माहिती जाणून घ्यावी, असे आवाहन शेंडे यांनी केले. सिंदेवाही येथील कृषी विज्ञान केंद्रात धानाचे संशोधन केले जाते. आतापर्यंत सिंदेवाही कृषी संशोधन केंद्राने धानाचे 15 वाण विकसित केले आहे.
 यापैकी 12 वाण पूर्वप्रसारित असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी शेंडे यांनी शास्त्रीय पद्धतीने वाण कसे विकसित केले जाते, याची माहिती शेतकऱ्यांना दिली. संशोधन केंद्राने विकसित केलेल्या विविध वाणाची माहिती देत शेतकऱ्यांनी कोणत्या जागेवर कोणते वाण लावले पाहिजे. धानाची लागवड खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादकता वाढविण्यासाठी काय केले पाहिजे, कीटकनाशकचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी काय उपाययोजना कराव्यात याबाबत शेंडे यांनी शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली.