चंद्रपूर मनपाद्वारे १७ प्रभागात पथनाट्याद्वारे जनजागृती

चंद्रपूर/प्रतिनिधी:

चंद्रपूर - स्वच्छ सर्वेक्षण २०१९ अंतर्गत स्वच्छतेसंबंधी जनजागृती मोहीम चंद्रपूर शहर महानगरपालिका सतत राबवीत आहे. समाजातील सर्वच घटक यासंबंधी जागृत होण्यास विविध उपक्रम मनपातर्फे आयोजित करण्यात येत आहे यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांद्वारे स्वच्छतेचे महत्व दर्शविण्यात येत आहे. या अनुषंगाने पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात येत आहे. नगरसेवकांच्या सहकार्याने शहरातील १७ प्रभागात स्वच्छतेवर पथनाट्य करण्यात आले आहे. त्याचबरोबर २७ ते ३० डिसेम्बर दरम्यान झालेल्या लायन्स एक्सपो मधे चंद्रपूर महानगरपालिकेचा स्टॉल ठेवण्यात आला होता ज्यात स्वच्छ सर्वेक्षण २०१९ बद्दल माहिती देण्यात आली. या एक्सपो मधे "स्वच्छतेची सायकल" ठेवण्यात आली होती. जी सर्वांच्याच आकर्षणाचे केंद्र ठरली.

देशातील सर्व शहरांमधील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे या करिता या शहरांना व पर्यायाने नागरिकांना स्वच्छतेची सवय लागावी या उद्देशाने केंद्र शासनामार्फत स्वच्छ भारत अभियान 2 ऑक्टोंबर, 2014 पासून राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 150 व्या जन्मदिनापर्यंत म्हणजे 2 ऑक्टोंबर 2019 पर्यंत संपूर्ण देशात राबविण्यात येत आहे. नागरिकांना स्वच्छता अभियानात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन देणे आणि लहान तसेच मोठी शहरे यांना अधिक राहाण्यायोग्य बनविण्याच्या दिशेने सर्वानी एकत्रित काम करणे यासाठी समाजाच्या सर्व घटकांमध्ये जनजागृती करणे हे या सर्वेक्षणाचे उद्दीष्ट आहे 
महापौर सौ. अंजली घोटेकर, आयुक्त श्री. संजय काकडे यांच्या मार्गदर्शनात मनपा आरोग्य अधिकारी (स्वच्छता) श्री. नितीन कापसे, श्री. प्रदीप मडावी, एएसपीएम क्रिएशनचे स्वयंसेवक व मनपा अधिकारी कर्मचारी कार्य करीत असून प्रभागात होणाऱ्या पथनाट्यांसाठी प्रभागातील सर्व नगरसेवकांचे सहकार्य लाभत आहे.