ऑनलाईन हॉटेल बुकींग अ‍ॅपचा नागपुरात विरोध

  • ‘ओयो पिडित हॉटेल मालिक मंच’ची स्थापना
  •  व्यवस्थापनाच्या फसवूणकीविरोधात पुकारणार एल्गार 


नागपूर : ‘ओयो’ हा आनलाईन हॉटेल बुकींग अ‍ॅप यंत्रणेद्वारे शहरातील हॉटेल मालिकांची फसवणूक केली जात असल्याच्या कारणावरून, शहरातील अनेक पिडित हॉटेल मालिकांनी या विरोधात संघर्ष उभारण्यासाठी ‘ओयो पिडित हॉटेल मालिक मंच’ची स्थापना केली असून, मंचाद्वारे ओयो व्यवस्थापनाकडे विविध मागण्या सादर करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.


आज वर्धा महामार्गावरील चेक इन सर्व्हिस अपार्टमेंट येथे पार पडलेल्या बैठकीत ‘ओयो पिडित हॉटेल मालिक मंच’ची स्थापना करण्यात आली. बैठकीला शैलेश पाटील (चेक इन सर्व्हिस अपार्टमेंट), अमोल बैराले (साई गेस्ट हाऊस), पंकज चंद (यूके आणि सुकून), वामन शेंडे (एसएस हाऊस), अभिजित किनगे (द्वारका इन), प्रतिन दुरगकर (केपी इन), संदीप शेट्टी (ट्रान्स सर्व्हिस अपार्टमेंट आणि एस क्युब हॉटेल), अल्का दिघोरीकर (ब्रीज इन आणि सेव्हेन स्वीट्स), मयूूर कुंभारे (आस्का इन), डोंगरे साहेब (आॅरेंजसिटी)यांच्यासह विविध हॉटेल रूम सर्व्हिसेसचे मालक सहभागी झाले होते. या बैठकीत झालेल्या चर्चेअंती विविध शर्थींसह ‘ओयो’ची सेवा सुरू ठेवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ओयो प्रशासनाकडून या अटी मान्य केल्या गेल्या नाही तर, ओयो आॅनलाईन सर्व्हिस तात्काळ थांबवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
मागण्या

(१) सेवेसाठी ग्राहकांकडून होणारे पेमेंट हॉटेल मालिकच स्विकारतील़ थेट ओयोकडे होणारे आॅनलाईन पेमेंट मान्य करणार नाही.

(२) कोणत्याही रूमसाठी ५०० रुपये भाडे आकारले जाते़ दिल्या जाणाºया सेवा बघता, यापुढे १५०० रुपयेपेक्षा कमी भाडे आकारले जाणार नाही.

(३) ओयो व्यवस्थापनाद्वारे आॅडिट करणे अन्यायकारक, ते करू दिले जाणार नाही.

(४) स्थानिक कपल्सला रूम भाड्याने दिले जाणार नाही.

(५) टॉयलेटरी अर्थात रूममध्ये देण्यात येणाºया सेवा, जसे साबण, शॅम्पू, तेल, पावडर आदी़ वस्तू ओयो प्रशासनाकडून स्विकारले जाणार नाही आणि त्यासाठी दिले जाणारे अडिच टक्के शुल्क दिले जाणार नाही़ त्याची व्यवस्था स्वत:च हॉटेल मालिक करतील.

(६) एकाच शहरात वेगवेगळ्या हॉटेल्सकडून ओयो प्रशासनाकडून कमिशन वेगवेगळ्या टक्केवारीने घेतले जाते़ हा अन्याय असून, एकाच सेवेकरिता, सर्व हॉटेल्सकडून एकसारखे कमिशन घेतले जावे.

(७) ओयोकडून आकारले जाणारे हॉटेल आणि रूमचे दर सर्वच हॉटेल्स व रूम्सला एकसारखे आकारले जावे.

(८) ओयोच्या मालकीच्या हॉटेल्सचे दर जास्त आकारले जातात, ते इतर हॉटेल्सप्रमाणेच असावे.

(९) फ्रॉड बूकींगचा प्रकार ओयोकडून केला जात आहे़ ते पुढे सहन केले जाणार नाही.
या सगळ्या मागण्या मान्य झाल्यास, ओयो आॅनलाईन बुकींग हॉटेल अ‍ॅपची सेवा सुरू ठेवण्यात येईल. अन्यथा, हॉटेल मालिकांवर अन्याय करणारी ही सेवा तात्काळ स्थगित करण्यात येईल.