विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश

उमेश तिवारी/ कारंजा (घाडगे) वर्धा

 कारंजा : वन विभागाअंतर्गत असलेल्या मरकसूर येथील शेतातल्या विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश आले. शिकारीसाठी कुत्र्याच्या मागे धावताना विहिरीत बिबट्या पडला असल्याचे सांगितले जात आहे.

 कारंजा वनविभाग आणि जलद बचाव पथकाने बचाव मोहीम राबवत विहिरीत पिंजरा टाकून बिबट्याला सुखरुप बाहेर काढले. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला त्याच्या अधिवासात सोडले जाईल, अशी माहिती देण्यात आली.

कारंजा (घाडगे) तालुक्यातील मरकसूर शिवारात श्याम वरोकर यांच्या शेतातील विहिरीत शुक्रवारच्या रात्री पडला. वरोकर त्यांच्या शेतात पाच कुत्रे आहेत. यातील एक कुत्रा पळताना दिसला. सोबत अन्य कुत्रेही पळू लागले. कुत्र्याला पाहताना विहिरीकडे गेले असता, वरोकर यांना विहिरीत बिबट्या पडलेला आढळला. त्यांनी तत्काळ माहिती वनविभागाला दिली. कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी दादा राऊत यांनी पाहणी केली. बचाव मोहीम राबवणे शक्य नसल्याने वन कर्मचाऱ्यांनी विहिरीवर पाळत ठेवली.

सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास वनविभागाच्या जलद बचाव पथकाच्या साह्याने बचाव पथकाने शेत गाठून बचावकार्य सुरु केले. बिबट्याला बाहेर काढण्यासाठी विहिरीत पिंजरा सोडण्यात आला. काही तासांच्या प्रयत्नानंतर बिबट्या पिंजऱ्यात गेला आणि वन विभागाने सुटकेचा श्वास सोडला. अखेर पिंजरा बाहेर काढत त्याला क्रेनच्या साह्याने हलविण्यात आले.

तब्बल तीन तासानंतर बिबट्याला काढले बाहेर - 

विहिरीत पडलेल्या बिबट्या हा साधारण साडेतीन वर्षांचा आहे. रात्री विहिरीत पडल्याने सकाळपासून मोहीम राबवण्यात आली. ही मोहीम वन विभाग आणि नव्याने तयार झालेल्या जलद पथक आणि बचावासाठी लागणाऱ्या साधनांच्या माध्यमातून फत्ते करण्यात आली. तब्बल तीन तासाच्या परिश्रमानंतर बिबट्या पिंजऱ्यात गेला आणि त्याला बाहेर काढण्यात आले, अशी माहिती कारंजा वनपरिक्षेत्र अधिकारी दादा राऊत यांनी दिली

विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात यश