भोजन वाटप सुरूच ठेवण्याचे आमदार श्री. किशोर जोरगेवारांचे निर्देश, मनपात घेतली आढावा बैठक
भोजन वाटप सुरूच ठेवण्याचे आमदार श्री. किशोर जोरगेवारांचे निर्देश
मनपात घेतली आढावा बैठक

 चंद्रपूर १७ एप्रिल  - कोरोना विषाणूचा सामना करत असतांना चंद्रपूरकर प्रशासनाला कौतुकास्पद सहकार्य करत आहे. अशा कठीण प्रसंगी प्रशासनानेही नागरिकांप्रती त्यांची जबाबदारी चोक पणे पार पाडली पाहिजे. संचारबंदीमूळे अनेक कुटूंब अडचणीत सापडले आहे. अशांना मदत म्हणून गरजू पर्यंत भोजन पोहचविण्याचे काम  चंद्रपूर महानगरपालिका करत आहे. धान्य व किराणा किट या गरजू नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे मनपातर्फे प्रयत्न केले जात आहेत, त्या पूर्ण वाटप होईपर्यंत भोजन वाटप सुरुच ठेवण्याच्या आमदार किशोर जोरगेवार यांनी १७ एप्रील रोजी मनपात घेतलेल्या आढावा बैठकीत दिल्या. 
   चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी आज चंद्रपूर महानगरपालिकेच्या अधिका-यांसह महानगरपालिकेच्या दालनात बैठक घेत मनपाच्या उपाययोजनांची माहिती जाणून घेतली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी मनपाच्या वतीने सुरु असलेल्या भोजन व्यवस्थेचा आढावा घेतला.   मनपाच्या वतीने काही दिवसात गरजू नागरिकांना किराणा व रेशन वितरित करण्यात येणार आहे. किराणा व रेशन किट प्रत्येक गरजूपर्यत पोहचेपर्यंत भोजन सेवा सुरुच ठेवण्याच्या सुचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी याप्रसंगी दिल्या. 
   मनपाकडून मोठ्या प्रमाणात भोजन वितरीत केल्या जात आहे यात अनेक सामाजिक संस्थाही आपले योगदान देत आहे. या वितरणाचे संयुक्त नियोजन करत शेवटच्या गरजूपर्यंत पोहचा असे यावेळी श्री.जोरगेवार यांनी सांगीतले. तसेच शहरात सर्वेद्वारे गरजुंपर्यत कसे पोहचता येईल या करीता यंत्रणा विस्तारित करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.  यावेळी आयुक्त श्री. राजेश मोहिते यांनी महानगरपालिकेच्या इतर उपायोजनांची माहिती माहिती आमदार महोदयांना दिली. 
    सदर बैठकीस मनपा आयूक्त राजेश मोहिते, उपायुक्त गजानन बोकडे, उपायुक्त विशाल वाघ, अधिक्षक अभियंता महेश बारई उपस्थीत होते .