ऐतिहासिक रामाळा तलावाची सफाई सुरू सौंदर्यीकरण व गाळ काढण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक

ऐतिहासिक रामाळा तलावाची सफाई सुरू

सौंदर्यीकरण व गाळ काढण्यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठक


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर,दि.31 मे: मान्सूनच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारची आपत्ती येऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाचे महत्त्वपूर्ण प्रयत्न सुरू आहेत. चंद्रपूर शहरातील गोंडकालीन रामाळा तलावाची मान्सून पूर्व सफाई आजपासून सुरू करण्यात आलेली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालय येथे 30 मे रोजी जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांच्या अध्यक्षतेत रामाळा तलावातील गाळ काढणे, सफाई, सौंदर्यीकरण यासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये रामाळा तलावाची मान्सूनपूर्व सफाई व गाळ काढणे गरजेचे आहे या विषयावर चर्चा झाली तसेच तात्काळ सफाईचे काम सुरू करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिले.

या बैठकीमध्ये प्रामुख्याने महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता सुषमा साखरवाडे,जिल्हा नियोजन अधिकारी ग.रू. वायाळ, जिल्हा खनिकर्म अधिकारी जी.डि कामडे , कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग, कार्यकारी अभियंता यांत्रिकी उपसासिंचन विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी, डब्ल्यूसीएलचे अधिकारी, इको प्रो चंद्रपूरचे अध्यक्ष बंडू धोत्रे तसेच रश्मी बाबेरवाल उपस्थित होते.

शहरातील ऐतिहासिक रामाळा तलावाचे सौंदर्यीकरण, मान्सून पूर्व गाळ काढणे, सफाई करणे महत्त्वाची असून यासाठी सामाजिक दायित्व निधीतून हे काम करावे, असे या बैठकीत ठरविण्यात आले. त्याचप्रमाणे, यासंदर्भात विविध विभाग प्रमुख व इको प्रोच्या अध्यक्षांनी आपल्या सूचना यावेळी दिल्यात.

आज पासून रामाळा तलावाची गणपती विसर्जनाच्या बाजूची सफाई सुरू झाली असून लवकरच सफाईचे काम पूर्ण होणार आहे.