मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारच्या 'मिशन बिगीन अगेन'च्या नियमात केले बदल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारच्या 'मिशन बिगीन अगेन'च्या नियमात केले बदल

दिनचर्या न्युज :-मुंबई : कोरोना लॉकडाऊनमध्ये पुनश्च हरीओम म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्य सरकारच्या 'मिशन बिगीन अगेन'ची घोषणा केली. या मिशन बिगीन अगेनबाबत जारी केलेल्या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

मुंबई महानगर प्रदेश म्हणजे मुंबई शहर आणि आजुबाजूच्या महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये प्रवासासाठी लॉकडाऊनमध्ये घातलेले निर्बंध सरकारने उठवले आहेत. त्यामुळे या भागात प्रवास करण्यासाठी आता कोणत्याही पासची गरज नाही. राज्य सरकारने आधी जारी केलेल्या नियमावलीत तसे बदल केले आहेत.

राज्य सरकारने मिशल बिगेन अगेन अंतर्गत जारी केलेल्या नियमांत बदल केले आहेत. त्यामुळे मुंबई महानगर विभागात (MMR) प्रवासाचे निर्बंध शिथिल केले आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर, वसई-विरार, उल्हासनगर, भिवंडी, कुळगाव-बदलापूर, अंबरनाथ या भागात आता नागरिकांना पासशिवाय प्रवास करता येणार आहे. याआधी अत्यावश्यक सेवा आणि तातडीच्या कामासाठी पास घेऊनच प्रवास करण्याची मूभा होती. त्यात आता बदल करण्यात आला आहे.

खाजगी कार्यालये दहा टक्के उपस्थितीत सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. ८ जूनपासून खाजगी कार्यालये १० टक्के किंवा १० कर्मचारी यापैकी जो आकडा जास्त असेल त्या क्षमतेने खाजगी कार्यालये सुरु करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे.

वृत्तपत्रांची छपाई आणि वितरण ७ जूनपासून सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. विद्यापीठ, कॉलेज आणि शाळा यातील शिकवण्याचे काम सोडून इतर कामे सुरु करण्यास सरकारने परवानगी दिली आहे. यात ऑनलाईन शिक्षणासाठी अभ्यासक्रम तयार करणे, उत्तरपत्रिका तपासणी आणि निकाल जाहीर करण्यासाठीच्या कामांचा समावेश आहे. या कामांसाठी लागणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावर बोलावता येईल, असे नियमावलीत म्हटले आहे.

कोरोना संकटामुळे लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर सरकारने प्रवासावर निर्बंध जाहीर केले होते. तसेच अत्यावश्यक सेवा वगळून अन्य व्यवहार बंद केले होते. पण आता पुन्हा पूर्वपदावर येण्यासाठी सरकारने काही व्यवहारांना हळूहळू शिथिलता द्यायला सुरुवात केली आहे.

महाराष्ट्रामध्ये ३० जूनपर्यंत लॉकडाऊन कायम आहे. त्यामुळे या कालावधीमध्ये शाळा, कॉलेज, धार्मिक स्थळं, स्पा, सलून, स्विमिंग पूल या गोष्टी बंद राहणार आहेत. राज्यामध्ये लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आल्यामुळे शुक्रवारपासून दुकानं उघडणार आहेत.