उद्या होणार भव्य लोकार्पण सोहळा, मनमोहक आणि आकर्षक आझाद बगीचा लोकसेवेसाठी सज्ज



उद्या होणार भव्य लोकार्पण सोहळा,
मनमोहक आणि आकर्षक आझाद बगीचा लोकसेवेसाठी सज्ज;

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-

चंद्रपूर शहराचे हृदयस्थळ असलेल्या मौलाना अबुल कलाम आझाद बगीचाचे रूप पालटले असून, भव्यदिव्य, मनमोहक आणि आकर्षक असा बगीचा चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने साकारण्यात आला आहे. त्याचा लोकार्पण सोहळा शनिवार, दिनांक २६ मार्च २०२२ रोजी दुपारी ५ वाजता आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी दिली.

आझाद बगीचा हे चंद्रपूर शहरातील नागरिकांसाठी हक्काचे स्थळ आहे. लहान मुलांपासून आबाल वृद्धांपर्यंत सर्वांना हिरव्यागार मोकळ्या वातावरणासह विरंगुळा म्हणून सुविधा अस्तित्वात आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य निरोगी आणि सुदृढ ठेवण्यासाठी सुव्यवस्थित व सुसज्ज अशा बगीचाचे नुतनीकरण करण्यात आले आहे. महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती संदीप आवारी आणि सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात या बगीच्याच्या सौंदर्यीकरण आणि नूतनीकरणाचे काम पूर्णत्वास नेण्यात आले.

बगिच्यात नेताजी पार्क, स्केटिंग आणि योगा, बॅडमिंटन कोर्ट, चिल्ड्रेन पार्क, ज्योतिबा फुले पार्क, पाथवे, शहीद स्मारक पार्क, फ्लावर गार्डन, गार्डनिंग आणि लॅंडस्कॅपिंग, भव्य मंदिर, आकर्षक विद्युत दिव्यांची रोषणाई, भव्य पार्किंग आणि फूड कोर्ट देखील साकारण्यात आले आहे.

चंद्रपूर शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या या मौलाना अबुल कलाम आझाद बगीच्याच्या विकासकामाचे भूमिपूजन ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करून कामाला प्रारंभ करण्यात आला होता. तेव्हा महापौर राखी कंचर्लावार यांनी नागरिकांसाठी सर्व सोई-सुविधायुक्त आझाद बगीचा कार्यान्वित होईल, याची शाश्वती दिली होती. दिलेल्या शब्द पूर्ण करीत सर्व सोयी आणि सुसज्ज बगीचा लोकाच्या सेवेत लवकरच येत आहे