आयुक्तांचे निवासस्थान नुतनीकरण व परिसर विकासासाठी मनपाचे ४० लाख खर्च , पण! निवासस्थानासाठी मनपा जाणार कोर्टात!




आयुक्तांच्या निवासस्थानासाठी मनपा जाणार कोर्टात

स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांची माहिती

पुढील निर्णय घेण्यासाठी उपमहापौर राहुल पावडे प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त

आयुक्तांचे विद्यमान निवासस्थान रिक्त करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

आयुक्तांचे निवासस्थान नुतनीकरण व परिसर विकासासाठी मनपाचे ४० लाख खर्च

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-

आयुक्त, चंद्रपूर शहर महानगरपालिका, चंद्रपूर यांना निवासस्थान नसल्याने मा. जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या शासकीय निवासस्थान समिती दिनांक १४/०५/२०१८ ला झालेल्या सभेमध्ये शासकीय निवास्थान क्र. ३/३ हे जागेसहित आयुक्त चंद्रपूर शहर महानगरपालिकेला हस्तांतरीत करण्याचे ठरले. २०१९ पासून मनपा आयुक्त या निवासस्थानी वास्तव्यास असतात. त्यासाठी निवासस्थान नुतनीकरण व परिसर विकासासाठी मनपाने ४० लाख खर्च केले. मात्र, आता निवासस्थान दिनांक ०८/०२/२०२२ नुसार तहसिलदार चंद्रपूर यांना अभिहस्तांकीत करण्यात आले आहे. त्यामुळे आता आयुक्तांसाठी शासकीय निवासस्थान नसल्याने उचित जागेचा शोध घेऊन आवश्यकतेनुसार जागा खरेदी व निवासस्थान बांधकाम करावे लागणार आहे. दरम्यान, ४ मार्च २०२२ रोजी झालेल्या स्थायी समिती सभेत आयुक्तांच्या निवासस्थानासाठी कोर्टात जाण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावर पुढील निर्णय घेण्यासाठी उपमहापौर राहुल पावडे यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात येत असल्याचे स्थायी समिती सभापती संदीप आवारी यांनी सांगितले.