महाराष्ट्रात दुकाने व आस्थापनांचे नामफलक मराठीत..
जिल्ह्यातील आस्थापनांचे नामफलक मराठीत असणे अनिवार्य
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर दि. 25 मार्च : जिल्ह्यातील प्रत्येक दुकानाचे नाव फलक मराठीत असणे अनिवार्य असेल, अशा तरतुदीचे महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनियम 2017 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. या अधिनियमाच्या कलम 7 अन्वये ज्या आस्थापनेत 10 पेक्षा कमी कामगार आहेत, आणि कलम 36 (क)(1) कलम 6 अन्वये नोंदीत प्रत्येक आस्थापनेत 10 पेक्षा अधिक कामगार आहेत, अशा सर्व आस्थापनांचे नामफलक देवनागरी लिपीत मराठी भाषेत असेल. परंतु, अशा आस्थापनेच्या नियोक्त्याकडील देवनागरी लिपीतील मराठी भाषेव्यतिरिक्त इतर कोणत्याही भाषेतील व लिपीतील नामफलक देखील असू शकतील. मराठी भाषेतील अक्षर लेखन नामफलकावर सुरुवातीला लिहिणे अनिवार्य असेल आणि मराठी भाषेतील अक्षराचा टंक आकार इतर कोणत्याही भाषेतील अक्षराच्या टंक आकारापेक्षा लहान असणार नाही.
तसेच ज्या आस्थापनेत मद्य पुरविले जाते किंवा विकले जाते, अशा आस्थापना, नाम फलकावर महान व्यक्तींची किंवा गडकिल्ल्यांची नावे लिहिता येणार नाही. असा बदल शासनाने दि. 17 मार्च 2022 रोजी सदर अधिनियमांतर्गत केला आहे. जिल्ह्यातील सर्व आस्थापना व मालकांनी उक्त तरतुदींचे तंतोतंत पालन करावे. सदर नियमाचा भंग करणाऱ्या आस्थापना व मालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त श्रीमती भोईटे यांनी केले आहे.