ऊर्जानगर – दुर्गापूर परिसरातील वाघ, बिबट, अस्‍वल सारख्‍या हिंसक प्राण्‍यांचा तातडीने बंदोबस्‍त करा, अन्यथा...! : आ. सुधीर मुनगंटीवार

ऊर्जानगर – दुर्गापूर परिसरातील वाघ, बिबट, अस्‍वल सारख्‍या हिंसक प्राण्‍यांचा तातडीने बंदोबस्‍त करा, अन्यथा...! : आ. सुधीर मुनगंटीवार


दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
ऊर्जानगर – दुर्गापूर परिसरातील वाघ, बिबट, अस्‍वल सारख्‍या हिंसक प्राण्‍यांचा तातडीने बंदोबस्‍त करून आवश्‍यक उपाययोजना कराव्या अशी मागणी विधिमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

आ. सुधीर मुनगंटीवार यांनी या परिसरातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या व लोकप्रतिनिधीच्या शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी श्री अजय गुल्हाने यांची भेट घेत त्यांना निवेदन सादर केले. यावेळी झालेल्या चर्चेत आ. सुधीर मुनगंटीवार म्हणाले,चंद्रपूर तालुक्‍यातील ऊर्जानगर-दुर्गापूर या परिसरात वाघ, बिबट, अस्‍वल, यासारख्‍या हिंसक प्राण्‍यांचा वावर असल्‍यामुळे मागील महिन्‍यात दिनांक १८.२.२०२२ रोजी ऊर्जानगर (नेरी) येथील श्री. राजु भडके या १५ वर्षीय मुलाचा वाघाच्‍या हल्‍ल्‍यात मृत्‍यु झाल्‍याची घटना ताजी असतांना दिनांक ३० मार्च २०२२ रोजी रात्रौ ९ वाजता ८ वर्षीय प्रतिक शेषराव बावणे या बालकाला घराच्‍या मागील भागात दबा धरून असलेल्‍या वाघाने झडप घेवून ठार केल्‍याची दुर्देवी दुःखद घटना घडली आहे. प्रतिक बावणे मुळचा भद्रावती तालुक्‍यातील बेलोरा येथील रहिवासी असून तो आजोबाच्‍या मृत्‍युप्रसंगी आला होता. आधीच शोकाकुल प्रसंगात असलेल्‍या कुटूंबावर प्रतिकच्या मृत्‍युमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

यापुर्वी या परिसरात मागील २ वर्षामध्‍ये १२ ते १३ व्‍यक्‍तींचा वाघ, बिबट, अस्‍वल अशा हिंसक प्राण्‍यांमुळे मृत्‍यु झालेला आहे. परंतु शासनाच्‍या दुर्लक्षामुळे आजही अशा घटना सातत्याने घडत आहे. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्‍ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. नागरिकांमध्‍ये वन प्रशासनाविरूध्‍द आक्रोश व असंतोष निर्माण झाला आहे. या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये या दृष्टीने तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी या चर्चेदरम्यान आ. मुनगंटीवार यांनी केली . नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ असाच सुरू राहिला तर भाजपा जनआंदोलन छेडेल असा इशारा आ. मुनगंटीवार यांनी दिला . या विषयाबाबत वनविभागाला त्वरित आदेश देत आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी श्री गुल्हाने यांनी दिले.

यावेळी शिष्टमंडळात भाजपचे रामपाल सिंग , जिल्हा परिषद सभापती रोशनी खान , वनिता आसुटकर , हनुमान काकडे , सरपंच हरिदास झाडे
नामदेव आसुटकर, संजय यादव, केमा भारत रायपुरे, फारुख शेख, श्रीनिवास जगवार, शांताराम चौखे , सुनील बरेकर, मदन चिवंडे , राहुल बिसेन , अमित तांबटकर, महिंद्रा लांबट, रंजना किनाके, लक्ष्मीसागर, लाला रामटेके , सागर गौरकर आदींची उपस्थिती होती.

दिनचर्या न्युज