भिसी येथील माजी सरपंच्यासह दोन दिग्गज नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश, काँग्रेस पक्षात मोठी खिंडाळ!




भिसी येथील माजी सरपंच्यासह दोन दिग्गज नेत्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश, काँग्रेस पक्षात मोठी खिंडाळ!


मुंबई येथे शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश

दिनचर्या न्युज :-
चिमूर :- प्रतिनिधी :-
आंबोली : भिसी येथील काँग्रेसचे नेते, चंद्रपूर जिल्हा काँग्रेस कमेटी उपाध्यक्ष व माजी सरपंच अरविंद रेवतकर, माजी जि. प. सदस्य व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्रीनिवास शेरकी या दोन दिग्गज नेत्यांनी 12 जुलै रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या मुख्य उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.त्यांच्यासोबतच भिसी शहर काँग्रेस कमेटी अध्यक्ष अक्षय खवसे, माजी ग्रा. पं. सदस्य पंकज रेवतकर यांनीही पक्षप्रवेश केला.

याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. सुप्रिया सुळे, माजी मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, राजेश टोपे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अन्य नेते उपस्थित होते.

मागील चार महिन्यापासून चिमूर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य यांनी चिमूर व भिसी येथे अनेकदा दौरे केले. श्रीनिवास शेरकी व राजेंद्र वैद्य राजकारणातील जुने मित्र आहेत. चिमूर विधानसभा क्षेत्रात अरविंद रेवतकर व शेरकी यांच्या पक्ष प्रवेशामुळे भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चिमूर तालुक्यात मजबूत स्थितीत उभा राहिलं, प्रसंगी स्थानिक स्वराज्य संस्थेत काही प्रमाणात जागा निवडून येतील, अशी चिन्ह दिसू लागली आहेत.

पक्षश्रेष्ठींनी दिले आदेश...

पक्षवाढीसाठी प्रयत्न करा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश अरविंद रेवतकर व श्रीनिवास शेरकी यांना पक्ष नेतृत्वाने दिल्यामुळे दोन्ही नेते त्वरित कामाला लागले आहेत. पुढील दीड महिन्यात भिसी येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जंगी सभा आयोजित करण्याची व तालुक्यातील शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश कार्यक्रम घेण्याची तयारी सुरु असल्याची बातमी विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद व नगर पंचायत निवडणुकीत बहुरंगी व चुरशीची लढत चिमूर तालुक्यात बघायला मिळणार आहे.


नगर पंचायत निवडणुकीवर काय होणार परिणाम?

अरविंद रेवतकर व श्रीनिवास शेरकी हे दोन्ही नेते भिसी ग्रामपंचायतच्या राजकारणातील मुरब्बी नेते आहेत.2022 मध्ये सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात भिसी नगर पंचायतीची पहिली निवडणूक संपन्न होणार आहे.ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षातून या दोन्ही नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे प्रथमदर्शनी नगर पंचायत निवडणुकीत काँग्रेस पक्षाला फटका बसेल असे वाटते. काँग्रेसच्या मतात विभाजन होईल, त्याचा फायदा भाजपालाच मिळेल, अशी गणितं भाजपाचे नेते आतापासूनच मांडू लागले आहेत. परंतु महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तिन्ही पक्षांनी आपसात युती केली तर भिसी नगर पंचायत निवडणुकीत भाजपाला महाविकास आघाडी तगडी टक्कर देऊ शकेल, अशी चर्चा राजकीय विश्लेषकात सुरु आहे.काँग्रेस पक्षाचे दिग्गज नेते धनराज मुंगले व चिमूर विधानसभा समन्वयक डॉ. सतीश वारजूकर यांना एकत्र येऊन आता भिसी नगर पंचायत निवडणुकीची धुरा हातात घ्यावी लागणार आहे. शिवाय भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी रणनीती आखून ती प्रत्यक्ष जमिनीवर राबवावी लागणार आहे.