शाळाबाह्य मुलांचा गांभिर्याने शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणा - अतिरिक्त जिल्हाधिकारी वरखेडकर, ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन-एल.जी.बी.टी. व वारांगना समुदायाला मिळणा-या योजनांचा आढावा
शाळाबाह्य मुलांचा गांभिर्याने शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणा
अतिरिक्त जिल्हाधिकारी वरखेडकर

मिशन ‘झिरो ड्रॉप आऊट’ अभियानचा आढावा

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 11 जुलै : शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरीत मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी राज्य शासनाच्यावतीने मिशन ‘झिरो ड्रॉप आऊट’ अभियान 5 ते 20 जुलै 2022 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील जी मुले शाळाबाह्य असतील त्यांचा गांभिर्याने शोध घेऊन या मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने योग्य नियोजन करावे, अशा सुचना अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात मिशन ‘झिरो ड्रॉप आऊट’ अभियानाचा आढावा घेतांना त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षणाधिकारी (माध्य.) कल्पना चव्हाण, बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य धनंजय चाफले, गटशिक्षणाधिकारी विशाल देशमुख आदी उपस्थित होते.
बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायद्यांतर्गत 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक बालकास दर्जेदार शिक्षण मिळणे, हा बालकांचा हक्क आहे, असे सांगून अतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर म्हणाल्या, जिल्ह्यात शहरालगतच्या धाब्यावर, वीट भट्टीवर, तसेच विविध बांधकाम प्रकल्प, वेगवेगळ्या आस्थापनांवर बालमजुर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाने अन्न व औषध प्रशासन आणि पोलिस विभागाचे सहकार्य घ्यावे. कामगार कल्याण कार्यालयातून बांधकाम मजुरांचा डाटा गोळा करून बांधकाम प्रकल्पावर भेटी द्याव्यात.
ज्यांची शाळेत नोंदणी आहे, पण काही कारणास्तव स्थलांतर झाले आहे,अशा बालकांचासुध्दा शोध घेणे आवश्यक आहे. मिशन ‘झिरो ड्राप आऊट’ हे केवळ शिक्षण विभागाचे अभियान न राहता यात स्थानिक नागरिकांनी सहभाग घेतला तर मुले शिक्षणापासून वंचित राहणार नाही. त्यामुळे नागरिकांनीसुध्दा या अभियानाला सहकार्य करावे. शाळाबाह्य मुले आढळली तर जवळच्या शाळेतील मुख्याध्यापकांना त्याबाबत माहिती द्यावी, असे आवाहन अपर जिल्हाधिका-यांनी केले.
बालकांना शाळाबाह्य होण्यापासून रोखण्यासाठी मिशन ‘झिेरो ड्रॉप आऊट’ 5 ते 20 जुलै या कालावधीत राबविण्यात येत आहे. यात शिक्षण विभागासोबतच महसूल, ग्रामविकास, नगरविकास, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, महिला व बालविकास, कामगार विभाग, आदिवासी विकास, अल्पसंख्यांक विकास विभाग, सार्वजनिक आरोग्य, गृह विभाग आदींच्या सहभागाने हे मिशन राबविण्यात आहे.
बैठकीला वाहतूक शाखेचे अनिल आळंदे, अधिव्याख्याता विनोद लवांडे, सामाजिक संघटनेचे हर्षवर्धन डांगे, समग्र शिक्षा अभियानचे जिल्हा समन्वयक सुर्यकांत भडके, महिला व बालविकास विभागाच्या कांचन वरठी आदी उपस्थित होते.
ऑगस्ट रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

झटपट निकाल प्राप्त करण्याची पक्षकारांना सुवर्णसंधीदिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 11 जुलै : जिल्ह्यात शनिवार दि. 13 ऑगस्ट 2022 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत असून विधिज्ञ, पक्षकार व नागरीकांनी यामध्ये उत्स्फुर्तपणे सहभागी होऊन सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव सुमित जोशी यांनी केले आहे.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली आणि महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, उच्च न्यायालय, मुंबई यांच्या सुचनेनुसार आणि प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा कविता बि. अग्रवाल यांच्या मार्गदर्शनात जिल्हामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात येत आहे.
झटपट निकाल हे लोक न्यायालयाचे वैशिष्ट्य, लोक न्यायालयाचा महत्त्वाचा फायदा म्हणजे यामध्ये प्रलंबित न्यायालयीन प्रकरणांचा आपसी समझोत्याने व सर्वसंमतीने त्वरित समक्ष निकाल केला जातो व त्या आदेशाला दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनामा एवढेच महत्व असते, व त्याची अंमलबजावणी सुध्दा करता येते. त्याव्दारे वेळ, पैसा, श्रमाची बचत होते. वादांचा कायमचा समोपचाराने निपटारा होतो, सर्वच पक्षांना जिंकल्याचे समाधान मिळत असल्याने भविष्यकालीन वाद टाळले जातात. या कार्यवाहीसाठी वेगळा शुल्क, खर्च लागत नाही.
चंद्रपूर जिल्हा मुख्यालयासह चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येत असलेल्या या लोकअदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबीत दिवाणी, फौजदारी, कलम 138 एन. आय अॅक्ट (धनादेश न
वटणे), बँकांची कर्ज वसूली आदी प्रकरणे, मोटार वाहन अपघात नुकसान भरपाई प्रकरणे, जमीन अधिग्रहण अर्ज, कामगार कायद्याखालील प्रकरणे,परमालक-पाडेकरू बाद, कौटुबिक वाद (विविह-विच्छेदन वगळता), इलेक्ट्रोसिटी अॅक्टचे समझोतायोग्य वाद तसेच न्यायालयात येण्या अगोदरची (प्रि-लिटीगेशन) प्रकरणे, महसुल, पाणीपट्टी, वीजबिल आपसी समझोत्याकरीता ठेवून ती सामंजस्याने सोडविण्याबाबतचे आवाहन सुमित जोशी यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी तसेच ज्या नागरिकांना आपली प्रकरणे सदर लोकअदालतीमध्ये ठेवायची असतील त्यांनी संबंधीत न्यायालयात किंवा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, चंद्रपूर येथे स्वत: येऊन किंवा हेल्पलाईन फोन नंबर 07172-271679, कार्यालयीन मोबाईल क्र. 8591903934, किंवा कार्यालयाचे कनिष्ठ लिपीक श्री. उराडे, क्र. 9689120265 श्री. सोनकुसरे, 9325318616 या क्रमांकावर संपर्क साधावा.एल.जी.बी.टी. व वारांगना समुदायाला मिळणा-या योजनांचा आढावा
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर, दि. 11 जुलै : जिल्ह्यात वास्तव्य करणाऱ्या लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्सजेंडर (LGBT) व वारांगना या समुदायाला शासनाच्या लागू असलेल्या योजनांबाबत उपजिल्हाधिकारी (निवडणूक) अश्विनी मांजे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा घेण्यात आला. तसेच या समुदायाला निवडणूक ओळखपत्र, राशन कार्ड, आधार कार्ड, बँक खाते या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने चर्चा करण्यात आली.
             शासनाने निर्गमित केलेल्या नवीन शासन आदेशानुसार लेस्बियन, गे, बायसेक्शुअल व ट्रान्सजेंडर आणि वारांगना समुदायाला समाजात समान न्याय, समान वागणूक, समान हक्क, समान अधिकार व समान संधी उपलब्ध व्हावी या हेतूने व त्यांना सर्व शासकीय  योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करतांना येत असलेल्या अडचणींना दूर करण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आल्याचे अश्विनी मांजे यांनी सांगितले.      चंद्रपूर जिल्ह्यात नोंदणी असलेल्या काही लेस्बियन, गे, बायसेक्शुअल व ट्रान्सजेंडर व वारांगना यांना लाभ देण्यात आला असून उर्वरित समुदायाची लवकरात लवकर नोंदणी करावी त्यांना देखील या योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने पावले उचलण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
         बैठकीला पुरवठा विभागाचे भारत तुमळे, मंगेश कुरेकर श्री.कुळमेथे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार, संबोधन ट्रस्टचे राज काचोळे यांची उपस्थिती होती.


दिनचर्या न्युज