मौशी ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंचासह एक सदस्य अपात्र...








मौशी ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच अपात्र

दिनचर्या न्युज :-
नागभीड :-
एकमेकांवर राजकीय कुरघोडी करण्याच्या नादात शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी जिल्हाधिकारी चंद्रपुर यांनी नागभीड तालुक्यांतील मौशी ग्रामपंचायतीचे सरपंच , उपसरपंच व एक ग्रा.पं. सदस्य अशा तिघांचे सदस्यत्व रद्द केल्याने पद गमवावे लागले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली असुन ग्रामविकासाकडे मात्र दुर्लक्ष होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत .
नागभीड तालुक्यांतील मौशी हे गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील आहे. १५ जानेवारी २०२१ ला झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कॅांग्रेसप्रणित गटाचे ५ तर भाजपप्रणित ४ ग्रा.पं. सदस्य निर्वाचित झालेत . त्यातुन कॅांग्रेसच्या सौ. संगिता प्रमोद करकाडे या सरपंच पदी तर दिगांबर शिवराम लोखंडे उपसरपंचपदी विराजमान झालेत . या निर्वाचित पदाधिकाऱ्यांकडुन गावविकासासाठी प्रयत्न होतील असे वाटत असतांनाच राजकीय वैमनस्यातुन सरपंच व उपसरपंच यांनी भाजपा गटातील ग्रा.पं. सदस्य अरविंद भुते यांचा दुसऱ्या तालुक्यात असलेल्या शासकीय जागेवरील अतिक्रमणाचा मुद्दा पुढे आणला . मौशी येथीलच त्रिलोक माधव बगमारे या कार्यकर्त्याच्या नावाने जिल्हाधिकारी चंद्रपुर यांच्याकडे अरविंद भुते यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी तक्रार दाखल केली .
या तक्रारीची माहिती होताच भुते व अन्य गावकऱ्यांनीही नाराजी दर्शवित आपल्यावरही अशीच तक्रार दाखल होऊ शकते याची कल्पना देत , एकमेकांविरोधात तक्रारी करु नका असे सुचविले . पण सरपंच व उपसरपंच यांनी आपला हेका न सोडल्याने नाईलाजाने अरविंद भुते यांनी सरपंच व उपसरपंच यांनीही शासकीय जागेवर मौशी गावातच अतिक्रमण केल्याचा पुरावा सादर करीत जिल्हाधिकारी चंद्रपुर यांच्याकडे सरपंच व उपसरपंच या दोघांचेही सदस्यत्व रद्द करण्यासाठी तक्रार दाखल केली .


      जिल्हाधिकारी चंद्रपुर यांनी या दोन्ही प्रकरणांची सुनावणी पुर्ण करीत जाने. २०२२ मध्ये ग्रा.पं. सदस्य अरविंद भुते यांना अपात्र करीत त्यांचे सदस्यत्व रद्द केले . मौशी चे सरपंच सौ. संगिता करकाडे व उपसरपंच दिगांबर लोखंडे यांनीही शासकीय जागेवर अतिक्रमण केल्याचे सिध्द झाल्याने जिल्हाधिकारी चंद्रपुर यांनी जुन २०२२ च्या अखेरीस या दोघांनीही अपात्र करीत त्यांचेही सदस्यत्व रद्द केले. 
               सदस्यत्व अपात्र व रद्द करण्याच्या भानगडीत निर्वाचित पदाधिकाऱ्यांकडुन गावविकासाकडे दुर्लक्ष झाल्याचा आता आरोप होत आहे. आता ९ सदस्यीय मौशी ग्रामपंचायतीत दोन्ही गटाकडे ३ सदस्य असल्याने  सरपंच व उपसरपंचाविना ग्रामपंचायत प्रशासन कसे चालणार याची चिंता गावकऱ्यांना लागली आहे. 
                 याबाबत प्रतिक्रिया देतांना ग्रा. पं. सदस्य अरविंद भुते यांनी सांगितले की गावकऱ्यांनी गाव विकासाच्या आशेने पाच वर्षासाठी पदाधिकाऱ्यांना निवडुन दिले असतांना आपापसातील हेवेदाव्यांच्या राजकारणामुळे ही परिस्थिती ओढवली असुन याला सरपंच व उपसरपंच हेच जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.