मनपाच्या आयुक्त कक्षात एका माथेफिरूचा स्वतःवर चाकूने हल्ला !



मनपाच्या आयुक्त कक्षात एका माथेफिरूचा स्वतःवर चाकूने हल्ला !


दिनचर्या न्युज :-

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेच्या आयुक्त कार्यालयात एका माथेफिरूने स्वतःवर चाकूने हल्ला करून जखमी करून घेतले. काही वेळासाठी महानगरपालिकेत तारांबळ उडाली.चंद्रपूर शहर महानगर पालिकेचे आयुक्त राजेश मोहीते यांच्या कक्षात घुसून एका इसमाने स्वतःवरच चाकू हल्ला केल्याची खळबळजनक घटना आज दुपारी एक वाजताच्या सुमाराला घडली. प्रसंगावधान राखत सुरक्षा रक्षकाने वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठी दुर्घटना कळली. लक्ष्मण पवार असे या जखमी इसमाचे नाव आहे. तो लातुर जिल्ह्यातील टाकळी येथील रहिवासी आहे. सध्या त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.

काही दिवसांपूर्वीच आयुक्त मोहीते यांना सुरक्षा रक्षक देण्यात आली. शहरातील समस्या घेवून शिष्टमंडळ, नागरिक आयुक्तांच्या भेटीसाठी येतात. अशा भेटीत अनेकदा वादविवाद होतात. मात्र आजपर्यंत असा प्रकार झाला नव्हता. दुपारी आपल्या कक्षात आयुक्त असताना पवारांनी त्यांच्या स्वीय सहाय्यकाकडे त्यांच्या भेटीची वेळ मागितली. थोड्याच वेळानंतर पवार यांना आयुक्तांच्या कक्षात प्रवेश मिळाला. आत आयुक्त आणि पवार दोघेच होते. अचानक आयुक्तांनी भेदरलेल्या अवस्थेत सुरक्षा रक्षकाला मोठ्याने हाक मारली. सुरक्षा रक्षकाने त्वरीत आता प्रवेश केला आणि समोरचे दृश्य बघून त्यांच्याही पायाखालची जमिन सरकली. पवारांनी स्वतःवरच चाकूचा हल्ला केला. यात ते जखमी झाले. अगदी क्षणभरात झाला प्रकार मनपातील कर्मचाऱ्यांना माहिती झाला. त्यांनीही आयुक्तांच्या कक्षाकडे धाव घेतली. काही वेळासाठी मनपात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान शहर पोलिसांना झाला प्रकाराची माहिती देण्यात आला. ते पोहचले आणि पवारला ताब्यात घेतले. त्यांच्यावर सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे. तो मनोरुग्ण असल्याचे वैद्यकिय अधिका-यांचे म्हणणे आहे. पुढील तपास शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वात सुरू आहे.