शिक्षणाला राष्ट्रभक्तीची जोड ही काळाची गरज- मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन सन्मित्र सैनिकी विद्यालयाचा वार्षिकोत्सव सोहळा थाटात संपन्न
शिक्षणाला राष्ट्रभक्तीची जोड ही काळाची गरज-
मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

सन्मित्र सैनिकी विद्यालयाचा वार्षिकोत्सव सोहळा थाटात संपन्न

दिनचर्या न्युज :
चंद्रपूर : २३/१/२०२३
व्हाट्सअपच्या आणि सोशल मीडियाचा प्रभाव असलेल्या आजच्या युगात माणूस स्वतःभोवति गुरफटत चालला आहे; एकांगी होवू लागला आहे. भारतात कधीही कशाची कमतरता नव्हती; शिवाय मोठा सांस्कृतिक वारसा आम्हाला लाभला आहे. उत्तम शिक्षण पद्धतीचे आम्ही कायम पुरस्कर्ते राहिले आहोत, आणि परंपरागत शिक्षणाला राष्ट्रभक्तीची जोड मिळणे ही विद्यार्थ्यांसाठी मोठी उपलब्धी असून ती काळाची गरज आहे. सैनिकी शाळेच्या माध्यमातून हे कार्य उत्तमरित्या पार पाडत असल्याचे समाधान आहे,त्यामुळे सन्मित्र सैनिकी विद्यालयाचे कौतुक करावेसे वाटते असे प्रतिपादन राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

चंद्रपूर - बल्लारपूर मार्गावरील विसापूर येथील सन्मित्र सैनिकी विद्यालयाच्या वार्षिक उत्सवात ते बोलत होते. यावेळी मंचावर गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे, सन्मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. परमानंद अंदनकर, सचिव अँड. निलेश चोरे, शाळा समितीचे अध्यक्ष निलकंठ कावडकर, कार्यकारणी सदस्य विजयराव वैद्य, विपिन देशपांडे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नितीन कावरे, कमांडंट सुरेंद्रकुमार राणा, सन्मित्र सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य अरुंधती कावडकर, स्कूल कॅप्टन प्रेम नंदुरकर यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर, कर्मचारी, पालक विद्यार्थी आणि नागरिकांची उपस्थिती होती.

याप्रसंगी स्वातंत्र्य सेनानी सुभाषचंद्र बोस, विद्येची देवता माता सरस्वती आणि भारत मातेच्या प्रतिमेला माल्यार्पण केल्यानंतर दीप प्रज्वलन करून वार्षिकोत्सव सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. तत्पूर्वी ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते प्रांगणात ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी "नमो मातृभूमी इथे जन्मलो मी, नमो आर्यभूमी इथे वाढलो मी" ही समर्थ रामदास स्वामींची प्रार्थना सादर केली.

यावेळी बोलताना ना. सुधीर मुनगंटीवार म्हणाले, सैनिकी पोशाखात प्रात्यक्षिक सुरू असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद, अभिमान आणि एकाग्रता होती. हे प्रात्यक्षिक भारतीय सैनिकाच्या एकूण स्थितीचे वर्णन करणारे आहे.
आज देशाला सुशिक्षित विद्यार्थ्यांसोबत आदर्श विद्यार्थ्यांची गरज आहे. सैनिकी विद्यालयाच्या माध्यमातून आदर्श विद्यार्थी या देशाला देण्याचे काम सुरू आहे. वाघासारखे पराक्रमी सैनिक घडविण्यासाठी सन्मित्र संस्थेने पुढे यावे, असे आवाहन देखील याप्रसंगी ना. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.