ओबीसीचे रास्ता रोको आंदोलन, तर उद्या लोकप्रतिनिधीच्या घरापर्यंत प्रेतयात्रा




ओबीसीचे रास्ता रोको आंदोलन, तर उद्या लोकप्रतिनिधीच्या घरापर्यंत प्रेतयात्रा

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :
मराठा समाजाच्या आंदोलनाला राज्यातील अर्धे मंत्रीमंडळ भेट द्यायला गेले होते. त्यानंतर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंदोलनस्थळी जाऊन जरांगे यांचे आंदोलन सोडविले. त्याचे आम्ही स्वागतच करतो. पण दुसरीकडे ओबीसींच्या रास्त मागण्यांसाठी चंद्रपुरात रवींद्र टोंगे गेल्या १३ दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन करीत आहे. टोंगे यांची प्रकृती खालावली असताना सुद्धा मंत्रीमंडळातील एकही मंत्री आंदोलन सोडविण्यासाठी आले नाही. यामुळे राज्य सरकार हे ओबीसी विरोधी असल्याची टिका आमदार सुधाकर अडबाले यांनी केली.

ओबीसींच्या रास्त मागण्यांसाठी चंद्रपुरात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे अन्नत्याग उपोषणाला बसले होते. टोंगे यांची प्रकृती खालावल्याने काल त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यानंतर आज चंद्रपूर-नागपूर महामार्गावर जनता कॉलेज चौकामध्ये आमदार सुधाकर अडबाले, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांच्या नेतृत्त्वात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस मुख्यालयात नेण्यात आले. त्यानंतर आंदोलकांना सोडण्यात आले.
मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समाविष्ट करू नये, महाराष्ट्र सरकारने बिहारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक जिल्ह्यात मुला व मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृह व स्वाधार योजना सुरु करण्यात यावी या मागण्यांसाठी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रवींद्र टोंगे ११ सप्टेंबरपासून अन्नत्याग उपोषणाला बसले होते. टोंगे यांची प्रकृती खालावल्याने काल त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. ओबीसींच्या रास्त मागण्यांसाठी लोकशाही पध्दतीने आंदोलनाचा पवित्रा उचलला असताना शासन स्तरावरून आंदोलन चिघडण्याचा प्रयत्न होताना दिसून येत आहे. रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावली असल्याने त्यांच्या जीवास काही झाल्यास यास सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार राहील. तेव्हा तात्काळ यासंदर्भात दखल घेण्यात यावी, अशी मागणी आमदार सुधाकर अडबाले यांनी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रवींद्र टोंगे यांना रुग्णालयात हलविल्यानंतर कालपासून विजय बलकी, प्रेमानंद जोगी हे अन्नत्याग आंदोलनाला बसले आहे. त्यानंतर झालेल्या ओबीसी महासंघाच्या बैठकीत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. उद्या (ता. २४) अन्नत्याग आंदोलनस्थळापासून लोकप्रतिनिधींच्या घरापर्यंत प्रेतयात्रा काढण्यात येणार आहे. ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सकाळी ११ वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन सचिन राजुरकर यांनी केले आहे.