शंकर हयात असताना भावसुनेने परस्पर जमीन हडपली, महसूल विभागावर संशयाची सुई !




शंकर हयात असताना भावसुनेने परस्पर जमीन हडपली,
महसूल विभागावर संशयाची सुई !

ग्रा.पं.नेही परवानगी न घेता खोदली विहीर : वृद्ध शेतकऱ्याचा पत्रकार परिषदेत आरोप

चंद्रपूर :
वरोरा तालुक्यातील चिकणी येथे असलेली वडिलोपर्जित शेतजमिन भावसुनेने परस्पर हडपली असून, कोणतीही भनक लागू न देता सातबाऱ्यावरून आपले नाव कमी केल्याचा आरोप वृद्ध शेतकरी शंकर झिबल मेश्राम यांनी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.

शंकर मेश्राम यांनी चिकणी येथे वडिलोपर्जित जमीन असून, या जमिनीवरील सातबाऱ्यावर वडिलांच्या मृत्यूनंतर शंकर झिबल मेश्राम व भाऊ महादेव झिबल मेश्राम यांची नावे होती. शंकर मेश्राम यांना दोन्ही मुलीच असल्याने ते मागील अनेक वर्षांपासून गाव सोडून चंद्रपूर येथे मुलगी लता आत्राम यांच्याकडे वास्तव्यास होते. त्यामुळे त्यांचे शेतकीडे दुर्लक्ष झाले होते. याच संधीचा फायदा घेत महादेव मेश्राम यांची पत्नी सुमन महादेव मेश्राम हिने काही महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून सातबाऱ्यावरून झिबल मेश्राम यांचे नाव कमी करून संपूर्ण जमीन हडपली. काही कामानिमित्त ते गावाला गेल्यानंतर ते शेतात गेले असता त्यांच्या शेतात त्यांच्या परवानगीविनाच ग्रामपंचायतच्या पाणीपुरवठा विहिरीचे बांधकाम सुरू होते. त्यामुळे त्यांनी अधिक चौकशी केली असता या जमिनीवरून त्यांचे नावच कमी करण्यात आल्याचे उजेडात आले. यानंतर वरोरा पोलीस ठाणे, स्थानिक तहसीलदार यांच्याकडे तक्रार करीत न्याय मिळवून देण्याची मागणी केली. मात्र, कुठेही यश आले नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली. जिल्हाधिकारी यांनी वरोरा येथील अधिकाऱ्यांकडे प्रकरण पाठविले. यावेळी वरोरा येथील काही अधिकाऱ्यांनी आपल्यालाच दमदाटी केल्याचा आरोप शंकर मेश्राम यांनी केला आहे. नागरी रोडवर असलेल्या शेती पासून नराचे पाणी वाहत असते. यासाठी माझ्या जमिनीतून ग्रामपंचायत ने ग्रामीण पाणीपुरवठा योजनेची विहीर खोदले.शेतात विहिरीचे काम करताना ग्रामपंचायत सचिव वांढरे, सरपंच वेणु उरकुडे, उपसरपंच किशोर बोधे, बंडू डाहुले आदींनी बोगस स्टॅम्पपेपर तयार करून शेतात विहिरीचे बांधकाम केल्याचा आरोपही झिबल मेश्राम यांनी केला आहे. जमीन परत मिळवून देण्यासह अनधिकृतपणे जमीन बळकावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शंकर झिबल मेश्राम, त्यांची मुलगी लता रामचंद्र आत्राम यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.