आजपासून चंद्रपुरात दोन दिवसीय जिल्हा ग्रंथोत्सव
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
विविध विषयांवर होणार परिसंवाद : सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवारांच्या हस्ते होणार उद्घाटन
चंद्रपूर : उच्च व तंत्रशिक्षण विभाग ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य व चंद्रपूर जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरणांतर्गत चंद्रपूर जिल्हा ग्रंथोत्सव ग्रंथ प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन शनिवार २४ फेब्रुवारीपासून डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालय चंद्रपूर येथे करण्यात आल्याची माहिती प्रभारी जिल्हा ग्रंथालय अधिकारी रत्नरक्षित शेंडे यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
ग्रंथोत्सवाचे उद्घाटन शनिवारी राज्याचे वने, सास्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शल्यचिकित्सक तथा साहित्यिक डॉ. शरदचंद्र सालफळे राहतील. तर प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, खा. अशोक नेते, आ. रामदास आंबटकर, आ. अभिजीत वंजारी, आ. सुधाकर अडबाले, आ. कीर्तिकुमार भांगडिया, आ. सुभाष धोटे, आ. किशोर जोरगेवार, आ. प्रतिभा धानोरकर, जिल्हाधिकारी विनय गौडा, जि. प. सीईओ विवेक जॉन्सन, पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, राज्य ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा. डॉ. गजानन कोटेवार, किरण धांडोरे, रत्नाकर नलावडे आदींची यावेळी उपस्थिती राहणार आहे.
शनिवारी सकाळी ८ वाजता जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय परिसरातून ग्रंथपूजन व ग्रंथदिंडी निघेल. यावेळी विनय गौडा, विवेक जॉन्सन, मुम्मका सुदर्शन यांची उपस्थिती राहील. दुपारी ३ वाजता वाङ्मय व अवांतर वाचनापासून मराठी वाचक का दुरावत आहे, या विषयावर डॉ. श्याम मोहरकर यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होणार आहे. या परिसंवादात प्रा. डॉ. धनराज खानोरकर, बंडोपंत बोढेकर, डॉ. राज मुसणे, डॉ. जयश्री शास्त्री, संजय रामगिरवार आदी भूमिका मांडतील. संध्याकाळी ५ वाजता कथाकथन कार्यक्रम होणार आहे. प्रा. डॉ. विद्याधर बन्सोड यांच्याच अध्यक्षतेखाली होणाऱ्या कथाकथनमध्ये संजय येरणे, मधुसूदन पुराणिक, वर्षा चौबे, गोपाल शिरपूरकर सहभागी होणार असल्याची माहिती यावेळी शेंडे यांनी दिली.
रविवार २५ फेब्रुवारी रोजी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यक्रम आहे. उपजिल्हाधिकारी संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमात आयएएस अधिकारी रणजित यादव, जि.प.चे उपमुख्य कार्यकाकरी अधिकारी श्याम वाखर्डे, सरदार पटेल महाविद्यालयाचे ग्रंथपाल डॉ. संजय भुत्तमवार युवकांना मार्गदर्शन करतील. दुपारी १२ वाजता 'शिवराज्यभिषेक सोहळा : एक विहंगावलोकन' या विषयावर परिसंवाद होणार असून,डॉ. प्रकाश शेंडे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात वक्ते म्हणून डॉ. योगेश दुधपचारे, डॉ. मिलिंद भगत, प्रा. श्याम हेडाऊ, प्रा. संजय उगेमुगे यांची उपस्थिती राहणार आहे. दुपारी ३ वाजता निमंत्रितांचे कवी संमेलन किशोर मुगल यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यात डॉ. पद्मरेखा धनकर, प्रदीप देशमुख, अविनाश पोईनकर, धनंजय साळवे, डॉ. सुधीर मोते, प्रवीण आडेकर, विजय वाटेकर, मालती सेमले, प्रा. आनंद भिमटे, लक्ष्मण खोब्रागडे, अरुण झगडकर, अमरदीप लोखंडे, प्रदीप हेमके, प्रा. तुलेश्वरी बालपांडे आदींची उपस्थिती राहणार आहे.
सायंकाळी ५ वाजता समारोपीय कार्यक्रम पार पडेल. अध्यक्षस्थानी सहाय्यक ग्रंथालक संचालक रत्नाकर नलावडे राहतील. मंचावर जि.प.च्या शिक्षणाधिकारी कल्पना चव्हाण, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष अनिल बोरगमवार, डॉ. श्याम मोहरकर, निखिल तांबेकर, रत्नरक्षित शेंडे, नरेश काळे, रवि नहाटे, गंगाधर मानकर, रमेश ठोंबरे, सुदर्शन बारापात्रे, नामदेव राऊत, मारोती राऊत, जगदिश मुडपल्लीवार आदींची उपस्थिती राहणार असल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.