बल्लारपुरातील सार्वजनिक शौचालय देखभाल व स्वच्छतेसाठी होतोय मोठा भ्रष्टाचार- प्रशांत झामरे मरे
बल्लारपुरातील सार्वजनिक शौचालय देखभाल व स्वच्छतेसाठी होतोय मोठा भ्रष्टाचार- प्रशांत झामरे 

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : बल्लारपूर नगर परिषदेच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या सार्वजनिक शौचालयावर महिन्याकाठी लाखो रुपये खर्च करूनही या शौचालयाची दुरवस्था आहे.
या शौचालयाच्या देखभाल व स्वच्छतेसाठी महिन्याकाठी मोठा भ्रष्टाचार होत आहे. एका बचत गटाला यांचे कंत्राट देण्यात आले आहे. मात्र, या बचत गटाकडून कोणतीच स्वच्छता व देखभाल केली जात नाही, मग पैसे कशाचे दिले जातात असा आरोप करीत शौचालय कंत्राटाच्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत झामरे यांनी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केली.

बल्लारपूर शहरात विविध ठिकाणी १५ सार्वजनिक शौचालये आहेत. यापैकी केवळ ९ शौचालयेच सुरू असून, सहा शौचालये बंद अवस्थेत आहेत. मात्र, नगरपरिषदेकडून पंधराही शौचालय सुरू असल्याची दिशाभूल करणारी माहिती देण्यात आल्याचा आरोप झामरे यांनी केला. सर्व पंधरा शौचालयाचे देखभाल, दुरुस्ती आणि स्वच्छतेचे कंत्राट जागृती सफाई कामगार बचत गटाला देण्यात आले आहे. यापैकी काही चौचालये पैसे द्या आणि वापरा या तत्वावर चालविली जात आहे. नगर परिषदेकडून प्रत्येक शौचालयाच्या देखभाल दुरुस्ती आणि स्वच्छतेसाठी दरमहा प्रती शौचालय १३ हजार १२२ रुपये म्हणजे पंधरा शौचालयावर दरमहा १ लाख ५७ हजार ४६४ रुपये खर्च होत आहे. मात्र, कंत्राटदार बचत गटाकडून कौणतीही स्वच्छता पाळली जात नाही. अनेक शौचालयात सिट फुटलेल्या आहेत. कुठे दरवाजे तुटलेले आहेत. तर कुठे घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. मात्र, असे असताना नगरपरिषदेकडून कंत्राटदाराला दरमहा बिल दिले जात आहे. या कंत्राटात नगरपरिषदेच्या काही अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा संशय झामरे यांनी व्यक्त केला असून, बचत गटाच्या नावावर हे अधिकारीच स्वत:चे खिसे भरत असल्याचा आरोप त्यांनी केला. विशेष म्हणजे, बचत गटाला दरमहा पैसे दिले जात असताना मुख्याधिकारी याबाबत अनभिज्ञ असल्याने झामरे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. याबाबतची माहिती घेण्यासाठी स्वच्छता विभागातील अधिकारी गणवीर यांना फोन द्वारे विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माध्यमाला प्रतिसाद दिला नाही.
त्यामुळे या शौचालय कंत्राटाची योग्य चौकशी संबंधित नगर परिषदेच्या स्वच्छता विभागाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी झामरे यांनी केली आहे. पत्रकार परिषदेला सूरज चौबे, अनिल बोराडे उपस्थित होते.