बोगस अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे मिळविली नोकरी, शासनाची दिशाभूल - आदिवासी टायगर सेनेची बडतर्फीची मागणी
बोगस अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे मिळविली नोकरी

सावली येथील गृहपाल झुरमुरे यांच्याकडून शासनाची दिशाभूल : आदिवासी टायगर सेनेची बडतर्फीची मागणी

दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय चंद्रपूर अंतर्गत सावली येथील मुलीच्या वसतिगृहात कार्यरत गृहपाल गीता एल. झुरमुरे यांनी बोगस अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवून शासनाची दिशाभूल केल्याचा आरोप आदिवासी टायगर सेनेने मंगळवारी चंद्रपुरात आयोजित पत्रकार परिषदेत केला असून, झुरमुले यांची चौकशी करून बडतर्फ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

गीता झुरमुरे यांनी आपण दोन्ही कानाने ८१ टक्के अपंग आहोत असे सांगून भंडारा जिल्हा रुग्णालयातून अपंग प्रमाणपत्र मिळविले आहे. दरम्यान, ही बाब काही आदिवासी संघटनांना माहिती होताच त्यांनी संबंधित विभागाकडे तक्रार करून चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हा कार्यालयापासून तर मुंबई मंत्रालयापर्यंत त्यांच्याविरोधात तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना पदोन्नती दिल्याची बाब उजेडात आली आहे. एकात्मिक आदिवासी विभाग गीता झुरमुरे यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. जिल्हा प्रकल्प अधिकारी चंद्रपूर यांनी आदिवासी संघटनेच्या तक्रारीनंतर जिल्हा शल्य चिकित्सक भंडारा यांना पत्र देऊन झुरमुरे यांच्या अपंगत्व प्रमाणपत्राची पडताळणी करून अहवाल मागितला आहे. तर झुरमुरे यांनाही सर्व कागदपत्रांसह अपंगत्व प्रमाणपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र, झुरमुर या जिल्हा प्रकल्प अधिकाऱ्यांच्या पत्राला ठेंगा दाखवित आहे.
काही वरिष्ठ अधिकारी झुरमुरे यांची पाठराखण करीत आहे. सात दिवसांच्या आत झुरमुरे यांची निलंबन करण्यात यावे, दिशाभूल करून उचलेले वेतन व्याजासहित वसूल करण्यात यावे, त्यांच्या गृहपाल कालावधीतील गैरप्रकाराची चौकशी करण्यात यावी आदी मागण्यांचे निवेदन आदिवासी विकास विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त आणि उपायुक्तांना पाठविण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. झुरमुरे यांचे निलंबन करण्यात आले नाही. तर जनआंदोलन उभारू असा इशारा यावेळी देण्यात आला. पत्रकार परिषदेला जितेश कुळमेथे, अभाविपचे जिल्हा युवा अध्यक्ष अतुल कोडापे, आदिवसी टायगर सेनेचे युवा जिल्हाध्यक्ष रंजित मडावी, शेखर मेश्राम, बाळू कुळमेथे, विराज सुरपाम, मुकेश पुरडकर उपस्थित होते.

भंडारा येथील जिल्हाशल्यचिकित्सकांना पत्र पाठवून अपंगप्रमाणपत्र पडताळणीचा अहवाल मागितला आहे. झुरमुरे यांनाही कागदपत्रांसह भंडारा जिल्हा रुग्णालयात उपस्थित राहून प्रमाणपत्र पडताळणीचे आदेश दिले होते. यानंतर परत दुसऱ्यांदा अपंगत्व प्रमाणपत्र पडताळणीचे आदेश काढण्यात आले आहेत. या प्रमाणपत्र पडताळणीला त्या सामोरे गेल्या नाही तर त्यांच्यावर विभागामार्फत उचित कारवाई करण्यात येईल.

श्री. राचर्लावार, प्रकल्प अधिकारी
जिल्हा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर