अधिवेशनात ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी यासह ३० मागण्यांचे ठराव मांडले
अमृतसरमध्ये घुमला ‘जय ओबीसी’चा नारा
राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नवव्या अधिवेशन थाटात
देशभरातील ओबीसींच्या गर्जनांनी गुरू नानक देव विद्यापीठाचे सभागृह गुंजले
दिनचर्या न्युज :-
अमृतसर (पंजाब)
देशात आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा वाढवून समाजाला लाभ मिळावा, अशी अपेक्षा राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नववे राष्ट्रीय अधिवेशन बुधवारी पंजाबमधील अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठाच्या गोल्डन ज्युबिली कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झाले. पंजाबमध्ये ओबीसी समाजाच्या मागण्यांचा आवाज या अधिवेशनाच्या निमित्ताने दिल्लीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अधिवेशनाला उद्घाटक म्हणून राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर तर पाहुणे म्हणून खासदार प्रतिभा धानोरकर, खासदार डॉ. नामदेव किरसान, माजी मंत्री महादेवराव जानकर, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार सुधाकर अडबाले, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे समन्वयक डॉ. अशोक जीवतोडे, महासचिव सचिन राजूरकर, उपाध्यक्ष किरण पांडव, प्रा. शेषराव येलेकर, हरयाणाचे माजी खासदार राजकुमार सैनी, गुरुनानक देव विद्यापीठ अमृतसचे सिनेट सदस्य सतपाल सिंग सोखी, वन महामंडळाचे माजी अध्यक्ष राजिंदर बिट्टा, आंध्र प्रदेश बीसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष शंकरराव, तेलंगण बीसी वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष जाजूला श्रीनिवास गौड, सेवानिवृत्त अधिकारी अशोक बाथ, गुणेश आरिकर, प्रकाश साबळे, दिनेश चोखारे, प्रकाश भागरथ, ऋषभ राऊत, अय्याज अहमद, मधू नाईक राज्याचे उपाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, उपाध्यक्ष सतीश वारजूरक, सुषमा भड, अॅड. प्रकाश पाटील, अनिल नाचपल्ले, चेतन शिंदे, हरवेसिंग कौशल, हरपितसिंग, अॅड. किशोर लांबट यांची प्रमुख उपस्थिती होती.
ओबीसींच्या मागण्यांच्या अनुषंगाने संसदेत, विधानसभेत, विधानपरिषदेत मुद्दे मांडणार असल्याचे मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितले. अधिवेशनात ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करावी यासह ३० मागण्यांचे ठराव घेण्यात आले. पंजाबमधील दहा टक्क्यांवर आरक्षण वाढविण्यासाठी एकजुटीने प्रयत्न करण्यावरही चर्चा करण्यात आली.
आत्मनिर्भर भारत अभियानात ओबीसींना महत्वपूर्ण मानले गेले आहे. ओबीसी आवाज योजना, महाज्योती, परदेशात शिक्षण सुविधा उपलब्ध करून दिली. ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची योजना आणली असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या व्हिडीओ संदेशात सांगितले.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाने अध्यक्ष डॉ. बबनराव तायवाडे यांनी भूमिका मांडली. अधिवेशनही मांडले. प्रास्ताविक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे सरचिटणीस सचिन राजूरकर यांनी केले. स्वागतपर भाषण माजी राष्ट्रपती ग्यानी झेलसिंग यांचे नातू इंद्रजित सिंग यांनी केले. संचालन राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे पंजाबमधील प्रमुख जसपालसिंग खिवा यांनी केले. आभार प्रदर्शन सहसचिव शरद वानखेडे यांनी केले.
दहावे अधिवेशन गोव्यात
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे दहावे अधिवेशन ७ ऑगस्ट २०२५मध्ये गोव्याला होणार असल्याची घोषणा अधिवेशनादरम्यान करण्यात आली.