रेड अलर्टच्या पावसातही यशस्वीरित्या पार पडला शिक्षक सेनेचा 'प्रेरणा दिवस' वृक्षारोपण अभियान
दिनचर्या न्युज :-
चंद्रपूर :-
शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त (२७ जुलै) 'प्रेरणा महिना' अंतर्गत महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेच्या वतीने गेल्या आठ वर्षांप्रमाणे यंदाही वृक्षारोपण पंधरवडा आयोजित करण्यात आला. शिक्षक सेना प्रमुख अभ्यंकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात हे अभियान सातत्याने राबवले जात असून आतापर्यंत लाखो झाडे लावून त्यांचे संगोपन करण्यात आले आहे.
यंदा या अभियानाची सुरुवात २५ जुलै २०२५ रोजी चंद्रपूरमधील प्रतिष्ठित चांदा पब्लिक स्कूल येथून करण्यात आली. २४ जुलैच्या रात्री हवामान विभागाने चंद्रपूर जिल्ह्यात रेड अलर्ट घोषित करत सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली होती. तरीही, महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे कार्यकर्ते आणि नेतेमंडळींनी मुसळधार पावसातही उत्साहाने वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.
या कार्यक्रमाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष श्री. राजेश नायडू यांनी केले. या वेळी शिवसेना, काँग्रेस, आणि जनविकास सेना या विविध पक्षांचे प्रतिनिधी देखील सहभागी झाले. कार्यक्रमात प्रमुख उपस्थित मान्यवरांमध्ये शिवसेनेच्या वरिष्ठ महिला नेत्या कुसुमताई उदार, वर्षाताई कोठेकर, काँग्रेसचे नेते युसूफभाई, जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष पप्पू देशमुख, गौरव नागदेवते, छत्रपती पुरस्कार प्राप्त कुंदन नायडू, सिटी कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. प्रतिमा नायडू, सुनील देवांगन, तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी वक्त्यांनी पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले आणि युवकांना अशा प्रेरणादायी उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. कुसुमताई उदार यांनी हा उपक्रम उद्धवसाहेबांच्या वाढदिवसाचे सर्वोत्तम पर्यावरणीय स्वरूप असल्याचे सांगितले, तर वर्षाताई कोठेकर यांनी शिक्षक सेनेच्या उपक्रमांना महिला आघाडीचा पूर्ण पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले.
या अभियानाच्या पुढील टप्प्यात, २५ जुलै रोजीच चंद्रपूरच्या सुप्रसिद्ध सेंट मायकेल इंग्लिश स्कूल मध्येही 'प्रेरणा दिना'निमित्त वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी शाळेचे वाइस प्रिन्सिपल श्री. सुधीर सर, शिक्षकवृंद तसेच शिवसेना महिला आघाडीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनीही शिक्षक सेनेच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाच्या शेवटी राजेश नायडू यांनी विशेषतः चांदा पब्लिक स्कूलच्या संचालिका सौ. स्मिता संजय जीवतोड़े, सेंट मायकेल स्कूलचे प्रिन्सिपल विकास सर, दोन्ही शाळांचे शिक्षकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी व सर्व सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले आणि असे विश्वास व्यक्त केला की हा वृक्षारोपण उपक्रम चंद्रपूर जिल्ह्यातील इतर शाळा व महाविद्यालयांमध्येही राबवला जाईल.
शिक्षक सेनेचा हा उपक्रम केवळ पर्यावरण रक्षणाच्या दिशेने प्रेरणादायी पाऊल नाही, तर राजकीय आणि सामाजिक एकतेचे उत्तम उदाहरणही आहे.