चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या हल्ल्यांवर विधिमंडळात चिंता आमदार अभिजित वंजारी यांची गस्तीपथक वाढविण्याची व उपाययोजनांची मागणी




चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांच्या हल्ल्यांवर विधिमंडळात चिंता

आमदार अभिजित वंजारी यांची गस्तीपथक वाढविण्याची व उपाययोजनांची मागणी

दिनचर्या न्युज :-
मुंबई/ चंद्रपूर | प्रतिनिधी
मुंबई येथे सुरू असलेल्या 2025 च्या पावसाळी अधिवेशनात चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ व इतर जंगली प्राण्यांच्या मानवी वस्तीवर होणाऱ्या सातत्यपूर्ण हल्ल्यांचा प्रश्न उपस्थित करत काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी यांनी वन विभागाकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली.

चंद्रपूर जिल्ह्यात ब्रह्मपुरी, राजूरा आणि इतर भागांमध्ये दिवसेंदिवस वाघांच्या हल्ल्यांमुळे नागरिकांचे प्राण जात आहेत. रोज कुठे महिला उचलली गेली, कुठे लहान बाळावर हल्ला झाला, अशा घटना वर्तमानपत्रांतून समोर येत आहेत,असे वंजारी म्हणाले.
ते पुढे म्हणाले, "परिस्थिती इतकी गंभीर आहे की गावांमधून कुत्रेसुद्धा संपून गेली आहेत. यावरून तिथे मानव व प्राण्यांमधील संघर्ष किती तीव्र आहे हे दिसून येते. वनविभागाकडून काही गस्तीपथक तयार करण्यात आली आहेत, पण ती अपुरी पडत आहेत.
आमदार वंजारी यांनी मंत्र्यांना उद्देशून विचारले की, "जोपर्यंत गस्ती करणाऱ्या पथकांची संख्या वाढवली जात नाही, वनक्षेत्रपाल व अन्य वन कर्मचाऱ्यांची भरती केली जात नाही, तोपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यातील हा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे सरकारने याकडे तातडीने लक्ष द्यावे व विशेष उपाययोजना जाहीर कराव्यात.
या मुद्द्यावर सरकारने कोणती भूमिका घेतली व वंजारी यांच्या मागणीनुसार पुढील निर्णय काय घेतला जातो, याकडे जिल्ह्याच्या जनतेचे लक्ष लागले आहे.