विरुरमध्ये युरियाचा तुटवडा : कृषी अधिकाऱ्यांचे तालुक्याकडे दुर्लक्ष
दिनचर्या न्युज :-
विरूर (प्रतिनिधी)
राजुरा तालुक्यातील विरुर परिसरात मोठ्या प्रमाणात धान व कापूस शेती केली जाते.या पिकांसाठी युरिया व अन्य रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो.मात्र सध्या परिसरात युरियासह जवळपास सर्वच खतांचा तुटवडा जाणवतो आहे.
शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की,कृषी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे खत वितरणात गोंधळ निर्माण झाला असून अनेक कृषी केंद्रांवर तुटवडा दाखवून जादा दर आकारले जात आहेत.एका महिन्यापासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पिकांची वाढ खुंटली आहे.धान व कापूस पिके पिवळसर होऊ लागली असून युरियाची तातडीने गरज आहे.
वेळेत खत उपलब्ध झाले नाही तर शेतकऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागणार आहे. कृषी प्रधान देशात जर शेतकऱ्यांनाच योग्य वेळी खत मिळाले नाही, तर याला कृषी प्रधान म्हणावे की नाही? असा प्रश्न शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.
